Join us

बालभारतीतर्फे पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही पुस्तके; आशिष शेलार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 1:52 AM

अरुण भारस्कर यांनी संस्थेसाठी एक ब्रेल प्रिंटर मिळावा, अशी मागणी यावेळी केली, तीही मान्य करून अशिष शेलार यांनी हा प्रिंटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांना दिली.

मुंबई : बालभारतीतर्फे अन्य भाषांप्रमाणे पुढील वर्षापासून ब्रेल लिपीत पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री अशिष शेलार यांनी मंगळवारी वांद्रे येथील कार्यक्रमात केली.

नाशिक येथील दि ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन (इंडिया) या संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील गाइड तयार करण्यात आले असून, त्याचे प्रकाशन बुधवारी वांद्रे येथील कार्यक्रमात शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर, ज्या कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर फंडातून या गाइडचे प्रकाशन करण्यात आले, त्या बँकेचे संचालक स्वामीनाथन यांच्यासह पदाधिकारी तसेच विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

अरुण भारस्कर यांनी संस्थेसाठी एक ब्रेल प्रिंटर मिळावा, अशी मागणी यावेळी केली, तीही मान्य करून अशिष शेलार यांनी हा प्रिंटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांना दिली. तसेच राज्यात अन्य भाषेतील आणि लिपीतील पाठ्यपुस्तके बालभारतीतर्फे प्रकाशित केली जातात. त्याचप्रमाणे, पुढील वर्षापासून ब्रेल लिपीतील पाठ्यपुस्तकेही बालभारतीतर्फे उपलब्ध करून देण्यात येतील, त्याबाबतचा निर्णय नुकताच झालेल्या बालभारतीच्या बोर्डाच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

ब्रेल लिपीतील पाठ्यपुस्तके बालभारतीतर्फे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, असे स्पष्ट करतानाच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळेच पुढील शैक्षणिक वर्षापासून दृष्टीहिन विद्यार्थ्यांना त्यांची पाठ्यपुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध होतील, अशी घोषणादेखील शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी केली.

टॅग्स :आशीष शेलार