'अंधेरीचा राजा' उद्या निघणार भव्य विसर्जन मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 08:05 PM2018-09-27T20:05:39+5:302018-09-27T20:06:08+5:30
उद्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता आझाद नगर 2 येथील गणेश मंडपातून अंधेरीच्या राजाच्या भव्यदिव्य अशी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही.रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सातबंगला, गंगाभवन मार्गे वेसावे समुदकिनारी येत्या शनिवारी दुपारी पोहचेल.
मनोहर कुंभेजकर
मुंबई - राज्यातील जवळपास सर्व गणपती विसर्जन अनंत चतुर्थीला होते. मात्र,नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंधेरीच्या राजाचे 1974पासून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होते. आझाद नगर मेट्रो रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला सेलिब्रेटीसह गणेश भाविकांनी यंदा देखील मोठी गर्दी केली होती. उद्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता आझाद नगर 2 येथील गणेश मंडपातून अंधेरीच्या राजाच्या भव्यदिव्य अशी विसर्जन मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर आझाद नगर, आंबोली, अंधेरी मार्केट, एस.व्ही.रोड, जयप्रकाश रोड, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सातबंगला, गंगाभवन मार्गे वेसावे समुदकिनारी येत्या शनिवारी दुपारी पोहचेल. त्यानंतर वेसाव्याचे माजी नगरसेवक मोतीराम भावे यांच्या कुटुंबीयांनी अंधेरीच्या राजाची यथासांग पूजा केल्यावर दुपारी 2 वाजता 18 तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाला मांडवी गल्ली गणेश विसर्जन मंडळाचे कार्यकर्ते वेसाव्याच्या खोल समुद्रात खास बोटीतून अंधेरीच्या राजाला भावपूर्ण निरोप देतील अशी माहिती आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि पालिकेचे माजी स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर(शैलेश) फणसे यांनी दिली.
दरवर्षी अनेक हुबेहूब आणि देशातील प्रसिद्ध मंदिरांचे देखावे साकार करणाऱ्या आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीनची यंदा ८.५ फूटांची अंधेरीच्या राजाची मूर्ती यंदा अष्टविनायकापैकी प्रसिद्ध असलेल्या थेऊरच्या गणपती मंदिरात विसावली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष केशव तोंडवळकर आणि सचिव विजय सावंत यांनी दिली. १९७३ साली येथील आझाद नगरमध्ये राहत असलेले आणि गोल्डन टोबँको,एक्सल,टाटा स्टील आणि अन्य कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कारखाने बंद पडले होते.आमचे कारखाने लवकर सुरु होऊ देत म्हणून आम्ही संकष्टीला विसर्जन करू असा नवस अंधेरीच्या राजाला केला.आणि कारखाने परत सुरु झाले.त्यामुळे १९७४ पासून अंधेरीच्या राजाचे दरवर्षी संकष्टीला सायंकाळी अंधेरीच्या राजाची संपूर्ण रात्रभर भव्य मिरवणूक निघते.या मिरवणुकी दरम्यान विद्युत रोषणाई करण्यात येते. तमाम महिला ठिकठिकाणी रांगोळी काढून आणि अंधेरीच्या राजाला ओवाळतात. तर अनेक गणेश भक्त अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतल्यावर संकष्टीचा उपवास सोडतात. मिरवणुकीच्या मार्गक्रमणात गणेश भक्तांसाठी अल्पोपहार आणि पाणपोईची व्यवस्था देखिल अमेक संस्था व दानशूर करतात. तर अंधेरी मार्केट येथील अल्पसंख्याक बांधव दिवाळीत आपला फटाक्यांचा धंदा चांगला होण्यासाठी अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतात अशी माहिती समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस आणि सहखजिनदार सचिन नायक यांनी शेवटी दिली.