फळांच्या राजालाही कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:10 AM2021-05-05T04:10:02+5:302021-05-05T04:10:02+5:30
ग्राहक मिळेनात; आंबा उत्पादक हवालदिल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबाही कोरोनाच्या कचाट्यातून सुटलेला ...
ग्राहक मिळेनात; आंबा उत्पादक हवालदिल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबाही कोरोनाच्या कचाट्यातून सुटलेला नाही. संचारबंदीमुळे ग्राहकांनी फिरवलेली पाठ, आर्थिक क्षेत्रातील अस्थिरतेमुळे निर्यातीवर परिणाम आणि खराब हवामानामुळे उत्पादनात घट, अशा तिहेरी कोंडीमुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पहिल्या लॉकडाऊनमुळे झालेले आर्थिक नुकसान यंदा भरून निघेल, अशी अपेक्षा असताना खराब हवामानामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले. यंदा फेब्रुवारी महिन्यापर्यंत अवकाळी पावसाने काढता पाय घेतला नाही. त्यात थंडीचे विषम प्रमाण आणि तापमानातील चढ-उतार यामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोहर गळून पडला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या तुलनेत रायगड जिल्ह्याला याचा अधिक फटका बसला. त्यामुळे केवळ २० ते २२ टक्के उत्पादन मिळाले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.
उत्पादन कमी झाल्याने भाव चांगला मिळण्याची अपेक्षा उत्पादकांना होती. मात्र, आंबा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आणि निर्बंध कठोर करण्यात आले. संचारबंदीमुळे ग्राहक संख्या कमी झाली. आर्थिक अस्थिरतेमुळे अनेकांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरवली. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी गृहनिर्माण संकुलांमध्ये जाऊन आंबा विक्रीचा प्रयत्न सुरू केला आहे. किमान उत्पादनखर्च तरी निघावा, हा यामागचा हेतू आहे.
बनावट हापूसचे पेव
कोकणातील हापूस येण्याआधी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून आंबा बाजारात दाखल होतो. तो दिसायला सारखा असला तरी चवीला निकृष्ट असतो. मात्र, ३०-४० रुपयांना मिळत असल्यामुळे व्यापारी तोच खरेदी करतात आणि ग्राहकांना कोकणातील हापूस म्हणून विकतात. त्याचा आर्थिक फटका उत्पादकांना बसत आहे. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देत आंध्र आणि कर्नाटकी आंब्यांच्या खोक्यांवर तसा नामोल्लेख करण्याची मागणी केली. शासनाने एपीएमसीला त्यासंदर्भात सूचना दिल्या; परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याची माहिती चंद्रकांत मोकल यांनी दिली. यासंदर्भात एपीएमसीचे नवनिर्वाचित सचिव सतीश सोनी यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
........................