लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘रक्ताचं नातं’ या ‘लोकमत’ समूहाच्या उपक्रमांर्तगत रक्तदान शिबिरात ‘गिरगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेतला. गिरगावातील सारस्वत ब्राह्मण समाज सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात ३७ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. विविध वयोगटातील रक्तदाते शिबिरात उत्साहाने सहभागी झाले.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’ समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़. त्याअंतर्गत निकदवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ अर्थात ‘गिरगावचा राजा’ने रक्तदानात पुढाकार घेतला. सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रक्तदानाची ही मोहीम सुरू होती.
‘गिरगावचा राजा’ मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत तेंडुलकर, सचिव संजय हरमळकर, कार्यकारी मंडळाचे सदस्य गणेश लिंगायत, हर्षद देसाई, सारस्वत बँकेचे ज्येष्ठ संचालक किशोर रांगणेकर, सारस्वत ब्राह्मण समाजाचे उपाध्यक्ष सुभाष कामत, प्रमुख कार्यवाह राजेंद्र देसाई, सहकार्यवाह नीलेश रांगणेकर, कार्यकारिणी सदस्य रवींद्र भांगले,
दळवी हाॅस्पिटलचे विश्वस्त अशोक टेंबुलकर यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी गिरगावचा राजा मंडळाचे स्वयंसेवक, पदाधिकारीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
चौकट
गिरगावचा राजा मंडळाने ९४ वर्षांच्या आपल्या वाटचालीत सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले आहेत. पूरग्रस्तांना मदत, कारगिल युद्ध निधी अशा प्रत्येक प्रसंगी मंडळ सामाजिक कार्यात पुढे राहिले आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून आयोजित रक्तदान शिबिरातही याच भावनेने मंडळ सहभागी झाले. यापुढे अशा उपक्रमात आमचा सहभाग असेल.
- श्रीकांत तेंडुलकर, अध्यक्ष, गिरगावचा राजा
चौकट
कोरोना महामारीच्या काळात रक्ताची गरज मोठ्या प्रमाणावर भासत आहे. सर्व सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान मोहिमेत सहभागी होत हे सामाजिक काम करण्याची गरज आहे. गिरगावचा राजा मंडळाने आजच्या शिबिरातून आपला सहभाग नोंदविला आहे. ‘लोकमत’ राबवीत असलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
- गणेश लिंगायत, मंडळाचे कार्यकारी सदस्य
चौकट
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. रक्ताची आवश्यकता लक्षात घेत सर्व रक्तगटाच्या लोकांनी रक्तदानासाठी पुढे यायला हवे. विशेषतः युवा वर्गाने अशा रक्तदान मोहिमांत आवर्जून सहभागी व्हायला हवे.
- ऊर्मिला बोराटे, रक्तदाता
फोटो ओळ
‘गिरगावचा राजा’ मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत तेंडुलकर आणि सारस्वत बँकेचे ज्येष्ठ संचालक किशोर रांगणेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी सचिव संजय हरमळकर, सारस्वत ब्राह्मण समाजाचे उपाध्यक्ष सुभाष कामत, प्रमुख कार्यवाह राजेंद्र देसाई, सहकार्यवाह नीलेश रांगणेकर, कार्यकारिणी सदस्य रवींद्र भांगले, दळवी हाॅस्पिटलचे विश्वस्त अशोक टेंबुलकर उपस्थित होते.