Join us

भारत-पाक बॉर्डरचा राजा...चालला जम्मू काश्मीरला; मुंबईतून गणपती बाप्पा झाले रवाना  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 12:37 PM

सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो

मुंबई - देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला असून मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यात सध्या जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला आहे. मात्र काश्मीरमधील लोक लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आतूर झालेले आहेत. 

मुंबईतून सोमवारी भारत-पाक बॉर्डरचा राजा काश्मीरसाठी रवाना झाला आहे. भारत-पाक सीमेवर गणपती बाप्पा विराजमान होतो. मुंबईतून काश्मीरसाठी हा बाप्पा रेल्वेने रवाना झाला आहे. जम्मू काश्मीरात तणाव असला तरी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. काश्मीरातील गणेशभक्त किरण ईशर यांनी मुंबईतून गणपती बाप्पांना घेऊन रवाना झालेत. गेल्या 10 वर्षापासून काश्मीरात गणेशोत्सव आनंदाने साजरा केला जातो. 

किरण ईशर यांनी मुंबईतून गणपतीच्या 3 मुर्ती घेऊन जम्मू काश्मीरला रवाना झालेत. यात 6.5 फूटाची गणेश बाप्पाची मुर्तीचा समावेश आहे. यावेळी गणपतीच्या स्वागतावेळी मोठी रांगोळी काढण्यात आली होती. रांगोळीत भारताचा नकाशा बनवून त्यात भारत-पाक बॉर्डरचा राजा लिहिण्यात आलं होतं. यावेळी किरण ईशर यांनी सांगितले की, मागील 10 वर्षापासून आम्ही गणपती उत्सव साजरा करतो. सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो असं ते म्हणाले. 

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यापासून काश्मीर खोऱ्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तेव्हापासून खोऱ्यात संचारबंदीसारखी परिस्थिती आहे.  दरम्यान, 15 ऑगस्टपासून खोऱ्यातील परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सीमेवर दरदिवशी पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहे. सशस्त्र संधीचे उल्लंघन करून पाकिस्तान भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतंय. इतकचं नाही तर पाकने भारतासोबत व्यापार संबधही तोडले आहेत. त्यामुळे अशा परिस्थिती गणेशोत्सावाच्या माध्यमातून जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी साजरा केलेला गणेशोत्सव निश्चित फायदेशीर ठरेल असं गणेशभक्त किरण ईशर यांना वाटत आहे.  

टॅग्स :गणेश मंडळ 2019गणेशोत्सवगणेशोत्सवजम्मू-काश्मीरकलम 370