मुंबई : दर वर्षी देशातील मंदिराची प्रतिकृती तयार करणारे मुंबईतील गणेश मंडळ म्हणून गणेशगल्ली येथील ‘मुंबईचा राजा’ प्रसिद्ध आहे. यंदाच्या वर्षी मंडळाने मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील सूर्य मंदिराची प्रतिकृती; तसेच २२ फूट उंच गणेशाची मूर्ती साकारली आहे. या मंडळाचा यंदा ९१ वा गणेशोत्सव सोहळा पार पडणार आहे.गणेशोत्सवात जी रक्कम जमा होते, त्याचा उपयोग सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी केला जातो. केरळमध्ये भयावह झालेल्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर वित्त आणि मनुष्यहानी झाली. मंडळाच्या वतीने या भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत आणि कपड्यांची मदत करण्यात आली. मागील वर्षी गणेशोत्सवादरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील बस आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्या वेळी मुंबईत अडकलेल्या अनेक नागरिकांना जेवणाची आणि तात्पुरती राहण्याची व्यवस्था मंडळाने केली होती.के.ई.एम. रुग्णालय रक्तपेढी, जे. जे. रुग्णालय रक्तपेढी, जे. जे. महानगर रक्तपेढी आणि प्रिन्स अली खान रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने व मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजित केले जाते. मंडळाच्या वतीने मोफत नेत्र चिकिस्ता शिबिराचे आयोजन करुन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जनतेला मोफत चष्म्यांचे वाटप केले जाते. शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. दर वर्षी गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवात विविध खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मातेचा भंडारा आयोजित केला जातो.भव्यतेची परंपरा व संस्कृतीची जोपासना करताना विभागातील गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा, रुग्णांसाठी रुग्ण सहाय्य निधी, मोफत रुग्णवाहिका सुविधा, विभागातील जनतेसाठी आवश्यक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मंडळातर्फे आयोजित नेत्र चिकित्सा शिबिरामध्ये मोतीबिंदूचे रुग्ण आढळले. त्यांची शस्त्रक्रिया डॉ. तात्याराव लहानेंसोबत त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मोफत करण्यात आली. मंडळाच्या वर्गणीदारांसाठी मोफत रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.नवरात्रौत्सवात भवानीमातेच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या साड्यांपैकी काही साड्या दर वर्षी विविध आश्रमातील भगिनींना सन्मानाने देण्यात येतात. नवरात्रीच्या वेळी मातेची भजने, मातेचा गोंधळ, विवाहित महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, कुंकूमार्चन, होमहवन यासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.दरम्यान, लालबागमधील सर्वांत पहिला सार्वजनिक गणपती पेरूच्या चाळीमध्ये १९२८ मध्ये बसविण्यात आला. १९४५ मध्ये सुभाषचंद्र बोस बाप्पाच्या रूपाने स्वराजाच्या सूर्याच्या सात घोड्यांच्या रथावर आरुढ, असा देखावा तयार करण्यात आला होता. त्यावर्षी भक्तांचा प्रतिसाद पाहून पंचेचाळीस दिवसांनी बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
सामाजिक कार्यात अग्रेसर ‘मुंबईचा राजा’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 12:42 AM