मुंबई :
सरकारी वसाहतीच्या उभारणीपासून ते मंत्रालय, विधिमंडळातील अनेक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे हक्काचे मंडळ म्हणून वांद्रे पूर्व येथील ‘हिंदू उत्सव मंडळ’ यंदा गणेश उत्सवाचे ६३ वे हीरकमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. मंडळाची स्थापना १९६१ मध्ये झाली आहे तेव्हापासून ‘खेरवाडीचा राजा’ या नावाने मंडळाचा गणपती ओळखला जातो. मंडळाने जपलेली पर्यावरणस्नेही परंपरा आणि समाजकार्य उल्लेखनीय आहे.
वांद्रे (पूर्व) सरकारी वसाहतीत शासकीय कर्मचाऱ्यांचा गणपती म्हणून उत्सवाची सुरुवात झाली. पुढे १९६१ पासून हिंदू उत्सव मंडळाने विविध उपक्रम राबवत मंडळाचा गणेशोत्सव लोकप्रिय केला. शाडूची गणेशमूर्ती आणि भाविकांना थेट मूर्तीची पूजा करता यावी, अशी पर्यावरणस्नेही परंपरा मंडळाने पहिल्या दिवसांपासून जोपासली आहे. आजची तरुणपिढीसुद्धा हे कार्य नेटाने पुढे चालवत आहे.
मंडळाने सलाम मुंबई संस्थेच्या मदतीने ‘तंबाखू मतलब खल्लास’ हा जनजागृतीपर कार्यक्रम करून विद्यार्थी आणि युवकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. कर्मचाऱ्यांना मंत्रालय, विधिमंडळ, विक्रीकर अशा कार्यालयात जाताना हार्बर लाईन वांद्रे पूर्व येथे रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक सातवरून रेल्वे ब्रीज स्काय वॉकपर्यंत वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. वसाहतीमधील नागरी स्वास्थ्य केंद्र येथे अतिदक्षता विभाग व शस्त्रक्रिया सुरू करण्यासाठी मंडळांचे प्रयत्न केले आहेत.
महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल, स्पर्धा परीक्षा, तसेच विभागीय परीक्षेतून अधिकारी कसे होतील, आकस्मिक निधन झाल्याने कुटुंबाची होणारी वणवण अशा प्रश्नांसाठी पुढाकार घेतात.
शासकीय कामात व्यस्त असताना दरवर्षी पालघर, तलासरी येथे आदिवासी पाड्यावर लहान मुलांसाठी दिवाळीचा फराळ, खेळणी व महिलांसाठी साड्या व इतर भेट वस्तू वाटप करण्याची परंपरा मंडळाने सुरू केली आहे. अशा प्रकारे मुला-बाळांना घेऊन वाडीवस्तीवर दिवाळी साजरी करताना कर्मचाऱ्यांना प्रचंड आनंद होतो. त्यामुळे दरवर्षी विविध खात्यांतील कर्मचारी आवर्जून या कार्यक्रमासाठी आपले योगदान आणि उपस्थिती लावत आहेत.- विद्याधर कदम, अध्यक्ष, हिंदू उत्सव मंडळ
गणपतीत विविध स्पर्धांचे आयोजन करून सर्वांना संधी उपलब्ध करून दिली जाते. महिलांसाठी पाककला स्पर्धा, होममिनिस्टर पैठणी, सांस्कृतिक कार्यक्रम जादूचे प्रयोग, दरवर्षी शिवजयंती उत्सव, होळी उत्सव, श्रीकृष्ण जयंती, दहीहंडी उत्सव, दसरा, नवीन वर्ष स्वागत गुढीपाडवा साजरा केला जातो. अशा उपक्रमांतून सर्वांचे व्यक्तिमत्व कसे विकसित होईल, यावर भर असतो.- अशोक चव्हाण, सरचिटणीस, हिंदू उत्सव मंडळ