Join us

सत्तेसाठी राजा-राणीची जोरदार फिल्डिंग

By admin | Published: January 24, 2017 6:17 AM

सत्तेचा मोह भल्याभल्यांना सुटलेला नाही, पण आरक्षणाने या सर्वांची गोची केली. मात्र, मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या या आरक्षणातूनही अनेकांचा

शेफाली परब / मुंबईसत्तेचा मोह भल्याभल्यांना सुटलेला नाही, पण आरक्षणाने या सर्वांची गोची केली. मात्र, मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या या आरक्षणातूनही अनेकांचा पळवाटा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरसेवकपद घरातच राहावे, यासाठी राजा-राणीची जोरदार फिल्डिंग सुरू आहे. प्रभाग फेररचनेने मोठी उलथापालट केली, तरी सत्तेसाठी नगरसेवक पती-पत्नीमधील ही संगीतखुर्ची कायम आहे. एवढेच नव्हे, तर या वेळीस आपल्याबरोबर पती अथवा पत्नीलाही उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांनी जोर लावला आहे. यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.वर्षानुवर्षे एकाच नगरसेवकाच्या प्रभागामधील मक्तेदारीला महिला आरक्षणाने धक्का दिला. आरक्षणात प्रभाग गेल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे दिग्गज बाहेर फेकले गेले. त्यामुळे नगरसेवक या पदावर आपला हक्का गाजवणारे हादरले, पण सत्तेची नशा काही सुटता सुटत नाही. त्यामुळे यापैकी अनेकांनी अन्य पर्याय अवलंबले. सत्ता आपल्याच हाती राहण्यासाठी घरच्या लक्ष्मीला निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले. त्यामुळे आरक्षणाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जात आहे.२००७पासून संगीतखुर्चीचा हा प्रकार वाढला. दोन-तीन टर्म सत्ता हाती आल्यामुळे पक्षात स्थान पक्के असलेल्या नगरसेवकांची दावेदारी वाढली. पक्षासाठी केलेल्या कार्याचा मोबदला पत्नीला उमेदवारी देऊन चुकता करण्याचा व्यवहार सुरू झाला. यामुळे राजकीय पक्षांमध्ये अशा दावेदारांची डोकेदुखी वाढली. फेब्रुवारी २०१७च्या निवडणुकीत प्रभाग फेररचनेने नवीन आव्हान उभे केले आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष धोका पत्करण्यास तयार नसल्याने, उमेदवारीचे दान अखेर अशा दावेदारांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.महिलाराज आलाच नाही...आरक्षणामुळे नगरसेवकांनी घराच्या चार भिंतीमध्ये असलेल्या आपल्या सौभाग्यवतींना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. मात्र, सत्तेची सूत्रे त्यांच्याकडेच राहिली. या महिला नगरसेविका केवळ आपल्या पतीच्या हातातील कळसूत्री बाहुल्या ठरल्या. त्यामुळे महापालिकेत महिला संख्येने अधिक असल्या, तरी महिलाराज कधी आलेच नाही. आरक्षणामुळे पतीच्या जागी निवडून आलेल्या नगरसेविकांमध्ये एखाद-दुसरा अपवाद सोडला, तर कोणीच फारशी छाप पाडली नाही.अशी सुरू आहे संगीतखुर्चीनिष्ठावंत शिवसैनिक म्हणून पत्नीला तिकीट मिळाले आणि मुंबईचे महापौरपदही. मात्र, अडीच वर्षे महापौरपद भूषविल्यानंतर स्नेहल आंबेकर यांना पुन्हा उमेदवारी हवी आहे. त्यांच्या दावेदारीला पक्षातूनच विरोध सुरू असला, तरी त्यांचे पती मनोहर यांच्यासाठीही तिकीट मिळण्याची मागणी आता पुढे आली आहे.कॉंग्रेसच्या नगरसेविका सुषमा साळुंखे आणि माजी नगरसेवक पती विनोद शेखर दावेदार आहेत. मात्र, शेखर यांनी आपण इच्छुक नसल्याचे कळविले आहे.समाजवादी पक्षाचे नगरसेवक पती-पत्नी अशरफ आझमी व दिलशाद आझमी. अशरफ आझमी व दिलशाद कुर्ल्यातून निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत.मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांचा प्रभाग महिला आरक्षित झाल्यामुळे, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका स्नेहल जाधव निवडणूक लढविणार असून, सुधीर जाधव यांना अन्य प्रभागातून तिकीट मिळण्याची चिन्हे आहेत.दादर, शिवाजी पार्क हा प्रतिष्ठेचा प्रभाग महिला आरक्षित झाल्याने, मनसेला धक्का बसला आहे. त्यामुळे येथील आक्रमक नगरसेवक मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे निवडणूक लढविणार आहेत. यासाठी त्यांनी तहसीलदार पदाचा राजीनामा दिला आहे, तर संदीप देशपांडेही स्वत: प्रभाग क्र. १८२मधून इच्छुक आहेत. च्राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांच्या पत्नी व माजी नगरसेविका भारती पिसाळ कांजूरमार्गमधून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.कॉंंग्रेसचे ब्रियान मिरांडा वाकोल्यातून तर त्यांच्या पत्नीसाठी कालिनातून प्रयत्न सुुरू आहेत.राष्ट्रवादीचे नगरसेवक हरुन खान यांच्या पत्नीला विक्रोळी पार्क साईटमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.माजी नगरसेवक काँग्रेसचे उपेंद्र दोशी हे स्वत: सायन रुग्णालय परिसरातून इच्छुक असून, त्यांच्या पत्नी व नगरसेविका नयना शेठ या माटुंग्याच्या दावेदार आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मोहसीन हैदर यांचा प्रभाग राखीव झाल्यामुळे, तेथे आता त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळावी, अशी मागणी होऊ लागली आहे.