शिवाजी महाराजांचे भगवे निशाण हे त्यागाचे प्रतीक आहे. प्रजेचे संरक्षण व्हावे. सामान्य माणूस सुखा-समाधानात राहावा, यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून समाजात समता यावी यासाठी आपले जीवन खर्ची घातले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निळे निशाण हे व्यापकतेचे प्रतीक त्यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण केली.बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३८६ वी जयंती. त्यांच्या पराक्रमाची गाथा मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न. १९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८० हा अवघा ५० वर्षांचा महाराजांचा जीवन प्रवास. त्यांनी केलेल्या पराक्रमास इतिहासात तोड नाही. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य आदर्शवत होते. त्यांनी शत्रूंवर विजय मिळविण्यासाठी वापरलेल्या ‘गनिमी’नीतीचे आजही परदेशातील विद्यापीठातून अध्ययन केले जाते. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे मोठे पराक्रमी व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होते. ते विजापूर, अहमदनगर या शाह्यांत सरदार होते. ते मोगलांच्या सेवेतही होते. महाराष्ट्रातील इंदापूर, सुपे, पुणे व चाकण आणि महाराष्ट्राबाहेरील बंगळूर व वेलोर हे प्रदेश शहाजीराजांच्या ताब्यात होते. वडील दूर असल्यामुळे महाराजांना घडविण्याची जबाबदारी माता जिजाबार्इंवर आली. या काळात समाज लयाला गेला होता. मुस्लीम राजवटीने महाराष्ट्र ताब्यात घेतला होता. सर्वत्र अन्याय, अत्याचार होत होते. भूमिपुत्रांचे हाल होत होते. अशावेळी जिजाबार्इंनी स्वराज्याचे स्वप्न उरी बाळगून शिवाजीला घडविले. त्यांच्यावर संस्कार केले. पुढे हेच स्वप्न शिवाजी महाराजांनी साकार केले.शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी १६४६ मध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली आणि २८ वर्षांनंतर ६ जून १६७४ ला आपला राज्याभिषेक करुन घेतला, तेव्हा ते ४४ वर्षांचे होते. या काळात त्यांनी अनेक प्रामाणिक आणि विश्वासू सहकारी जोडले. त्यात हिरोजी फर्जद, मोरोपंत पिंगळे, कान्होजी जेधे, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे आदींचा समावेश होता. विजापूरचा सरदार अफजलखान शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा निर्धार करुन प्रचंड फौजेनिशी चालून आला. महाराजांनी डावपेच लढवून खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीस १६ नोव्हेंबर, १६५९ ला बोलावले. भेट झाली व नंतरच्या झटापटीत राजांनी अफजल खानाला ठार मारले व त्याच्या प्रचंड फौजेचा पराभव केला. महाराजांनी वेळ पाहून शत्रूच्या शक्तीचा अंदाज घेवून गनिमी काव्याने शत्रूवर विजय मिळविला. पन्हाळा किल्ल्यातून सुटका, शाहिस्तेखानाचे आक्र मण व त्याचा पराभव, सुरतेवरील लूट, पुरंदरचा तह, आग्रा भेट व मोगलांच्या नजरकैदेतून सुटका या सर्व घटना महाराजांच्या पराक्रमाची आणि बुद्धिचातुर्याची महती अधोरेखित करणारी आहे. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राज्यव्यवस्थेवर नजर टाकल्यास ती किती व्यापक होती, याची खात्री पटते. त्यांच्या अष्टप्रधान मंडळात अर्थखाते, राजकीय बाबी व हेर खाते, परराष्ट्रव्यवहार खाते, पत्रव्यवहार खाते, धार्मिक बाबी, दानधर्म खाते व न्याय खाते या बाबींचा समावेश होता. शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाला हात लावण्याची कुणाला हिंंमत होत नव्हती. महाराज हिंंदू - मुस्लीम असा भेद करीत नव्हते. त्यांचे अनेक विश्वासू सहकारी हे मुस्लीम होते. महाराजांनी चोख सैन्यव्यवस्था उभारली होती. त्यांच्याकडे एकूण १ लाख घोडदळ होते. मध्ययुगात नौदलाची निर्मिती करणारा एकमेव राज्यकर्ता म्हणजे शिवाजी महाराज त्यांनी सुमारे २०० जहाजांचे आरमार उभारले होते. महाराजांकडे ३०० किल्ले होते. त्यात ७० जलदुर्गांचा समावेश होता. राजगड ही शिवाजी महाराजांची पहिली तर रायगड दुसरी राजधानी होती. १६७० मध्ये शिवाजी महाराज राजगडावरुन रायगडास राहण्यास आले. पुढे येथेच त्यांचा राज्याभिषेक झाला. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातील बराच प्रदेश स्वराज्यात समाविष्ट होता. तसेच महाराष्ट्राबाहेरील वेलारे, कोलार, बाळापूर, होस्कोट वगैरे ठाणी तसेच तंजावरचा काही भाग शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराज व संत तुकाराम हे समकालीन. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून झोपलेले समाजमन जागृत केले. यामुळे स्वराज्य आपण निर्माण करु शकतो, अशी समाजभावना निर्माण झाली. या बाबींचा शिवाजी महाराजांना लाभ झाला. तुकारामांनी शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी अनुकूल भूमी बनवली.१९ व्या शतकात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीत सहभाग घेतला. रायगडावरील त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. आपल्या साहित्यातूनही महाराजांचा गुणगौरव केला. २० व्या शतकात महात्मा फुले यांना आपले गुरु मानणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीची होळी करुन मानवी स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी गेल्यावर २८ डिसेंबर १९२७ ला रायगडलाही भेट दिली. तेथे त्यांनी महाराजांच्या समाधीला मानवंदना दिली. शिवाजी महाराजांच्या त्रिशतक जयंतीचा उत्सव महाराष्ट्रात साजरा झाला. त्या प्रसंगानिमित्त ठाणे जिल्ह्यातील बदलापूरला शिवजयंतीची सभा झाली. या सभेचे अध्यक्षपद डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भूषविले होते. तेथे जमलेल्या मोठ्या समुदायापुढे शिवाजी महाराजांचे चरित्र, कार्य नि धोरण याविषयी बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते. शिवाजी महाराजांचे भगवे निशाण हे त्यागाचे प्रतीक आहे. प्रजेचे संरक्षण व्हावे, सामान्य माणूस सुखा-समाधानात राहावा यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून समाजात समता यावी यासाठी आपले जीवन खर्ची घातले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निळे निशाण हे व्यापकतेचे प्रतीक त्यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण केली. आजचे राजकारणी मात्र या महापुरुषांना जाती-जातीत पक्षा-पक्षात वाटून घेत आहेत. हिमालयापेक्षा उत्तुंग आणि सागरापेक्षा विशाल असणाऱ्या त्यांच्या महान कार्याला मर्यादा घालीत आहेत. एक महापुरुष घडविण्यात एका महिलेची मोठी भूमिका असते, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात जिजाऊंची मोठी भूमिका आहे. येणाऱ्या प्रत्येक पिढीला शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे चरित्र प्रेरणा देत राहील.> सध्या महाराष्ट्रभर एक स्टाइल जोरदार फिरत आहे आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गेटअप. जागोजागी छत्रपतींसारखी दाढी-मुछ आणि कपाळावर चंद्रकोर तसेच तरुण नजरेस येत आहेत. उगाच चित्रविचित्र स्टाइलपेक्षा राजांची आठवण करून देणारी स्टाइल खरोखरच स्तुत्य आहे परंतु विचार करायला लावणारी गोष्ट अशी की ज्या वेगाने आपण महाराजांच्या दिसण्याचे, त्यांच्या पेहरावाचे अनुकरण करीत आहोत त्याच वेगाने त्यांच्या विचारांचेही अनुकरण करणार आहोत? खरेतर महाराजांनाही तेच आवडेल.राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ ट्रस्टचे संस्थापक तसेच राष्ट्रीय अध्यक्ष शिवसंत विजय खिलारे यांनी आतापर्यंत लाखों तरुणांना शिवरायांच्या विचारांची शिकवणूक दिली असून तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी या संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. शिवजयंतीनिमित्त त्यांच्याशी साधलेल्या या संवादातून नशेच्या आहारी गेलेले तरुण, तसेच पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले. शिवराय म्हणजे गुणांची खाण होते, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील चांगले गुण घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी या देशाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल. महाराजांसारखा पेहराव करणाऱ्या तरूणांनी शिवचरित्राचे नक्कीच वाचन करावे यासाठी राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाच्या वतीने राष्ट्रात ठिकठिकाणी जनजागृतीचे काम केले जात आहे. सध्याच्या पिढीला शिवाजी महाराजांच्या अफाट कर्तृत्वाची ओळख करुन देण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. नैतिकतेचे भान ठेवून एक नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूच्या समाजाचा विकास घडविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
प्रजेच्या कल्याणाचा ध्यास घेतलेला राजा
By admin | Published: February 19, 2016 2:35 AM