राजे जिंकले... ...राजे हरले !--सुपरहिट

By admin | Published: September 22, 2014 08:53 PM2014-09-22T20:53:17+5:302014-09-22T22:03:33+5:30

समजा तुम्ही बुध्दिबळ खेळताय. तुमचा राजा कोंडीत सापडलाय. अशावेळी तुम्ही एकच कराल. आपल्या प्याद्याचा बळी देऊन राजा वाचवाल. येऽऽस. अगदी अश्शीऽऽच खेळी सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील दोन ‘राजां’नी केली.

Kings have won ... ... kings lose! - Superhit | राजे जिंकले... ...राजे हरले !--सुपरहिट

राजे जिंकले... ...राजे हरले !--सुपरहिट

Next

समजा तुम्ही बुध्दिबळ खेळताय. तुमचा राजा कोंडीत सापडलाय. अशावेळी तुम्ही एकच कराल. आपल्या प्याद्याचा बळी देऊन राजा वाचवाल. येऽऽस. अगदी अश्शीऽऽच खेळी सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील दोन ‘राजां’नी केली. फक्त गंमत अशी की, ‘आपल्या प्याद्यांना सेफ करण्यासाठी या दोघांनी आपल्याच ‘राजा’चा बळी दिला.’ तुम्ही म्हणाल, ‘बळी गेलेला हा राजा कोण?’ त्याचं उत्तर मात्र बुवा, तुम्हाला ‘सुरूचि’वरच मिळेल.
सातारा जिल्ह्याचं राजकारण राजघराण्यांभोवतीच फिरतं, हे ठावूक; पण हेच राजकारण राजघराण्यांनाही फिरवतं, हे पहिल्यांदाच दिसलेलं. शिवेंद्रसिंहराजेंवर विश्वास ठेवून अमितदादांनी आणलेले फटाके मेढ्याच्या अडगळीत पडले, तर बारामतीकरांवर विसंबून बाबाराजेंनी केलेले जावळीचे आडाखेही क्षणार्धात चुकले. खरंतर, बाबाराजेंच्या विश्वासाला तडा गेला, याचा अर्थ रामराजेंनी त्यांचा विश्वासघात केला, असाही नव्हे. रामराजे फक्त नेहमीप्रमाणं त्यांच्या ‘धुरंधर राजकारणी’ स्वभावाला जागले, एवढंच.
बारामतीकरांच्या तालमीत तयार झालेले रामराजे नेहमीच ‘उंटाची तिरकी चाल’ खेळण्यात माहीर. समोरच्या विरोधकाचे विचार जिथं संपतात, तिथून म्हणे त्यांच्या कल्पना सुरू होतात. कुणाला कधी अन् कसा धक्का द्यावा, याचं तंत्र शिकावं तर त्यांच्याकडून. मात्र, कुणालाही कळू न देता पवारांनी त्यांच्याच पालकमंत्रिपदाला धक्का दिला, हा भाग वेगळा. उदयनराजे म्हणजे ‘सरळसोट हत्ती.’ विरोधकांना धडका देत निघाले म्हणजे समोरचा हमखास आडवा पडणार. वेळप्रसंगी स्वत:च्याही दोन-चार प्यादी पायदळी तुडविणार. साताऱ्याच्या सारीपाटावरील चाणाक्ष ‘घोडा’ म्हणजे शशिकांत ल्हासुर्णेकर. एक दिवस जावळीत, एक दिवस मुंबईत तर अर्धा दिवस कोरेगावात, असं अडीच घरं फिरणारा हा घोडा परवा झेडपीत पाहता-पाहता डाव जिंकून गेला. ‘धनगर’ समाजाच्या नावावर रामराजेंनी अध्यक्षपद फलटणला नेलं. उदयनराजेंच्या नावावर शिंदेंनी उपाध्यक्षपद स्वत:च्या मतदारसंघाला मिळवून दिलं. ‘राजें’च्या ‘रवी’चा ‘उदय’ झाला म्हणून उदयनराजे शिंदेंवर खूश झाले; पण त्यामुळं कोरेगावातील उदयनराजेंचे काँग्रेस समर्थक पुरते हतबल झाले. हे पाहून शिंदेही गालातल्या गालात खुदकन् हसले.
आजपावेतो, जिल्हा परिषद अन् जिल्हा बँकेच्या राजकारणात ‘राम, लक्ष्मण अन् शिव’ युती जुळलेली. केवळ उदयनराजेंना ‘काऊंटर’ करण्यासाठी ‘राम-लक्ष्मण’ जोडीनं बाबाराजेंना ‘कॅच’ केलेलं. मात्र पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर शिंदेंचा उदयनराजेंशी राजकीय तह झालेला. त्यातच जावळीतला गुंता सोडविण्यासाठी बाबाराजेंनाही नाईलाजानं शिंदेंसोबत हातमिळवणी करावी लागलेली. अशातच लोकसभेला फलटणमध्ये राष्ट्रवादीला पिछाडी मिळालेली. त्यामुळं पिलांना पाण्याखाली घालून स्वत:च्या जीव वाचविणाऱ्या माकडीणीची कथा वास्तवातल्या राजकारणात प्रकटली. अमित कदमांना उपाध्यक्षपद न मिळाल्यास शिवेंद्रराजेंना ऐन निवडणुकीत जावळीत अडचण होऊ शकते, हे माहीत असूनही साऱ्यांनीच त्यांच्याकडं पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलेलं. तात्पर्य, ‘उंट, घोडा अन् हत्ती’च्या साठमारीत बिचाऱ्या प्याद्याचा मात्र बळी गेलेला !

सचिन जवळकोटे

Web Title: Kings have won ... ... kings lose! - Superhit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.