Join us

'हे तर सातारचे राजे'; शिवसेनेकडून उदयनराजेंची खिल्ली, भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 8:55 AM

शिवसेनेने मात्र उदयनराजेंना भाजपाची शिस्त लागत असल्याचं म्हटलं आहे.

मुंबई - साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशानंतर सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली. कित्येकांनी भाजपाला उदयनराजे आणि उदयनराजेंना भाजपा झेपणार नाही, अशा शब्दात या प्रवेशाचं विश्लेषण केलं. तर, विधानसभा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनीही राज्याचे छत्रपती किती दिवस भाजपात राहतात हेच पाहायचंय, असे म्हणत त्यांच्या भाजपा प्रवेशावर टीका केली. 

शिवसेनेने मात्र उदयनराजेंना भाजपाची शिस्त लागत असल्याचं म्हटलं आहे. भाजपाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयराजे आमच्याकडे आल्याचे ठासून सांगण्यात येत आहे. मात्र, शिवसेनेने उदयनराजेंना 'सातारचे राजे' असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. तर, भाजपाला टोला लगावला आहे. कारण, उदयनराजेंनी कोण मोदी? आमच्या साताऱ्यात मोदी पेढेवाले आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली होती, याचाही संदर्भ शिवसेनेने अग्रलेखात केला आहे. तसेच, थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते, तर उदयनराजेंनी दिल्लीतील हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपाचा रस्ता पकडला, असे म्हणत उदनयराजेंच्या भाजपा प्रवेशावर फिरकी घेतली आहे. उदनयनराजेंनी भाजपा प्रवेशावेळी कॉलर उडवली नसल्याचा दाखलाही सामनातून देण्यात आला आहे. 

''शिस्त, तत्व, संस्कार, नितिमत्त आणि साधनशुचिता या पंचसुत्रीवर भाजपाचा डोलारा उभा आहे. अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपाच्या शिस्तीत बसत नाहीत. शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा. पण, याची कल्पना देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याच्या राजांना दिली असेल. येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत. थोरल्या छत्रपतींनी तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशिर्वादाने भाजपाचा रस्ता पडकला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!'' असे म्हणत शिवसेनेने उदयनराजेंची भूमिका बदलल्याचं सामनाच्या अग्रलेखातून सांगितलं आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील महाजनादेश यात्रेत उदयनराजेंचं कौतुक करत राष्ट्रवादीवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसने छत्रपतींच्या घराण्याचा केवळ वापर केला. त्या बदल्यात एक दशांशही त्यांना दिलेलं नाही. छत्रपतींनी मागण्या करायच्या नसतात, त्यांनी आम्हाला आज्ञा करायची. छत्रपतींच्या सर्व आज्ञा हा मावळा पूर्ण करेल, असे उद्गार फडणवीस यांनी साताऱ्यातील जनतेसमोर काढले आहेत.

टॅग्स :उदयनराजे भोसलेशिवसेनाउद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसदिल्लीराजकारण