समीर वानखेडेंच्याच संमतीने किरण गोसावी व अन्य दोघे छाप्यामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 09:30 AM2023-07-19T09:30:16+5:302023-07-19T09:30:45+5:30

बडतर्फ अधिकाऱ्याने दिली सीबीआयला माहिती

Kiran Gosavi and two others in the raid with the consent of Sameer Wankhede | समीर वानखेडेंच्याच संमतीने किरण गोसावी व अन्य दोघे छाप्यामध्ये

समीर वानखेडेंच्याच संमतीने किरण गोसावी व अन्य दोघे छाप्यामध्ये

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आर्यन खान याला अटक न करण्यासाठी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासोबत आरोपी असलेला एनसीबीच्या गुप्तचर विभागाचा तत्कालीन अधिकारी आशिष रंजन प्रसाद याने सीबीआय चौकशीत नवा खुलासा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची दिशा बदलणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कॉर्डिलिया क्रुझवरील छापेमारीच्या दरम्यान किरण गोसावी, प्रभाकर साईल आणि मनीष भानुशाली यांना या प्रकरणात पंच बनविण्याची संमती वानखेडे यांनी दिल्याची माहिती त्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. 

यापूर्वी वानखेडे यांच्या चौकशीच्या दरम्यान आपल्याला हे तिघेही पंच कोण आहेत, याची माहिती नसल्याचा दावा वानखेडे यांनी केला होता. छाप्याच्या दरम्यान ज्यावेळी किरण गोसावी, प्रभाकर साईल आणि मनीष भानुशाली हे तिघे क्रुझ टर्मिनलपाशी आले. त्यावेळी ते कोण आहेत, याची आपल्याला माहिती नव्हती. त्यामुळे आपण त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केल्याचे आशिष रंजन प्रसाद याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते, तर वानखेडे यांना त्यांची माहिती होती असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, या तिघांपैकी मनीष भानुशाली याने या छाप्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान त्याला या क्रुझवर अमली पदार्थांचे सेवन होणार असल्याची माहिती मिळाली होती व ती त्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले होते, तर किरण गोसावी याचा आर्यन खानसोबतचा फोटो त्यावेळी व्हायरल झाला होता. 

पैशांच्या मागणीसाठी फोन 
किरण गोसावी यानेच त्यावेळी पैशांच्या मागणीसाठी शाहरुख खान यांची मॅनेजर पूजा ददलानी यांना फोन केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी समीर वानखेडे यांची तीन वेळा सीबीआयने चौकशी केली असून, मुंबई उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. वानखेडे यांच्यासह पाच जणांविरोधात सीबीआयने ११ मे रोजी गुन्हा दाखल करत, वानखेडे व त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांशी संबंधित २९ ठिकाणी छापेमारी केली होती.

 

Web Title: Kiran Gosavi and two others in the raid with the consent of Sameer Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.