Join us

गोसावी, भानुशाली, पाटील यांनी आर्यनबाबत केली डील; विजय पगारेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2021 7:31 AM

गाडीवर पोलीस प्लेट आणि पोलीस कॅप होती. या गाडीत  गोसावी, भानुशाली आणि सुनील होते.

मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईबद्दल आरोप-प्रत्यारोप होत असताना, याप्रकरणी विजय पगारे नावाच्या  एका व्यक्तीने आर्यनला या प्रकरणात मुद्दाम अडकविण्यात आले होते, असा दावा केला आहे. सुनील पाटील, किरण गोसावी, मनीष भानुशाली, सॅम डिसोझा यांनी त्याबाबत डील केले होते, असा दावा त्याने शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

मुळचा धुळे येथील असलेला पगारे हा आपण काही कामानिमित्त गेल्या सहा महिन्यापासून सुनील पाटील याच्यासमवेत आहे. त्याच्याकडून आपले पैसे येण्याचे बाकी असल्याचे सांगत तो म्हणाला की, क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या आधी  मी त्यांच्यासोबत ‘द ललित’ या हॉटेललाही थांबलो आणि अनेक हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत राहिलो. २७ सप्टेंबरला वाशीमध्ये फॉर्च्युन हॉटेलमध्ये दोन रुम बुक होत्या. साधारण साडेसातच्या सुमारास भानुशाली आणि एक जाडी मुलगी त्या ठिकाणी आली होती. त्या रात्री पाटील अहमदाबादला गेत्यानंतर रात्री बारा वाजता एमएच १२ इनोव्हा गाडी ३००० क्रमांकाच्या गाडीत ते बसले.

गाडीवर पोलीस प्लेट आणि पोलीस कॅप होती. या गाडीत  गोसावी, भानुशाली आणि सुनील होते. ते अहमदाबादला जायला निघाले. २८ तारखेला मी संध्याकाळी सुनील यांना फोन केला तर ते म्हणाले अहमदाबादला पोहोचलो नाही. त्यानंतरही, तुझे पैसे मिळतील, एवढेच ते सांगत होते. त्यानंतर एकदा सकाळी सात-सव्वासातला मनीष भानुशाली माझ्या रुममध्ये आला, तेरा पैसा मिल जायेगा. सुनील  अहमदाबाद गया है, असे त्याने सांगितले. 

आम्ही गाडीतून निघालो. त्यावेळी तो बडबड करत होता. इतने में डील हुआ था. इतनाही क्यों मिला? ५० लाख रुपये लेकर के. पी. गोसावी गायब तो नही हो गया, असे तो बडबडत होता. मला त्याचे काही समजत नव्हते.  पण एनसीबीच्या कार्यालयात पोहोचल्यावर  शाहरुखच्या मुलाला अटक झाल्याचे मला कळले.  भानुशाली याच प्रकरणाबाबत वाटेत कधी २५ तर कधी १८ कोटी म्हणत होता. साडेसहा कोटीचा हवाला झाला आहे. कधी तो पूजा, कधी सॅम डिसोझाचे नाव घेत होता. तर कधी मयूर हे नाव घेत होता. एनसीबीच्या कार्यालयापासून मी त्याला ठाण्याला सोडले. तेव्हाही गेम फेल हो गया वगैरे तो बोलत होता. हे सर्वजण या प्रकरणात सामील होते, असा दावा पगारे याने केला.

आर्यन खानची एनसीबी कार्यालयात हजेरी

क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात जामिनावर बाहेर असलेला शाहरुख खान याचा मुलगा आर्यन  खान याने शुक्रवारी केंद्रीय अमली पदार्थ  नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) कार्यालयात हजेरी लावली.  उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याने वकिलासमवेत उपस्थित राहून स्वाक्षरी केली.

एनसीबीने २ ऑक्टोबरला ग्रीन गेटजवळ केलेल्या कारवाईमध्ये एकूण आठ जणांना  अटक केली होती. त्यापैकी आर्यनला उच्च न्यायालयाने २८ ऑक्टोबरला जामीन मंजूर केला होता. मात्र कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ३० ऑक्टोबरला आर्थर रोड  कारागृहातून त्याची सुटका झाली. कोर्टाने अन्य अटींबरोबर दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात सकाळी ११ ते २ या वेळेत हजेरी लावण्याची अट घातली आहे. त्यानुसार आर्यन आपले वकील निखिल मानशिंदे यांच्यासोबत काल सकाळी पांढऱ्या रंगाच्या रेंज रोव्हरमधून आला होता.

दिवाळी पाडवा असल्याने कार्यालय बंद होते. त्यामुळे त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांकडे उपस्थितीची नोंद करून ते परत माघारी फिरले. दरम्यान, कार्डेलियावरील कारवाई आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे  यांच्याबद्दल आरोप-प्रत्यारोपामुळे हा विषय राष्ट्रीयस्तरावर चर्चेत आला आहे. त्यामुळे एनसीबीच्या  मुख्यालयाने हे प्रकरण मुंबईकडून काढून दिल्लीच्या पथकाकडे सोपविले आहे.

टॅग्स :आर्यन खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो