Kirit Somaiya: राऊतांनी दोन सिनेमे काढलेत, मनोरंजन हा त्यांचा विषय; किरीट सोमय्यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:45 PM2022-02-17T12:45:34+5:302022-02-17T12:45:59+5:30
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सरकारला द्यावेत. केवळ टेलिव्हिजन वाहिन्यांसमोर आरोप करू नयेत, असं म्हणतानाच राऊत यांनी दोन सिनेमे काढले आहेत. त्यामुळे मनोरंजन हा त्यांचा विषय असल्याचं विधान करत किरीट सोमय्यांनी पलटलवार केला आहे.
मुंबई-
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सरकारला द्यावेत. केवळ टेलिव्हिजन वाहिन्यांसमोर आरोप करू नयेत, असं म्हणतानाच राऊत यांनी दोन सिनेमे काढले आहेत. त्यामुळे मनोरंजन हा त्यांचा विषय असल्याचं विधान करत किरीट सोमय्यांनी पलटलवार केला आहे. 'मी कोणतेही आरोप करताना त्याचे सबळ पुरावे देतो. वृत्त वाहिन्यांनीही एखादा व्यक्ती आरोप करत असेल तर त्याचे पुरावे संबंधित व्यक्तीकडे आहेत का याची पडताळणी करुन घ्यायला हवी. त्यानंतरच बातम्या दाखवाव्यात. कारण राऊतांकडून माध्यमांचा गैरवापर केला जात आहे. राऊतांकडे जर माझ्या किंवा माझ्या मुलाविरोधात पुरावे असतील तर ते कोर्टात द्यावेत. सरकार त्यांचंच आहे', असं आव्हान किरीट सोमय्या यांनी राऊतांना दिलं आहे.
उद्या अलिबागला जाऊन तक्रार करणार
उद्धव ठाकरेंच्या नावावरचे १९ बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये पत्रं लिहून माझ्या नावावर बंगले करा असं सांगितलं होतं. मी या बंगल्यांबाबत काहीच बोललो नाही. पण संजय राऊतांनीच हा विषय उकरू काढला आहे. बंगल्यांबाबत ठाकरे कुटुंबीयांनी बोलावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रविंद्र वायकर या बंगल्याबाबत का बोलत नाहीत? संजय राऊतच या बंगल्याबाबत का बोलत आहेत? असा सवाल उपस्थित करत किरीट सोमय्यांनी निशाणा साधला.
जानेवारी २०१९ मध्ये माझ्या नावानं बंगले करा, असं रश्मी ठाकरेंचं पत्र आहे. मी बंगले दाखवणार नाही. तुम्हीच कागदपत्रांच्या आधारे त्या ठिकाणी बंगले असल्याचं सिद्ध केलं आहे. मी जाऊन तिथे बंगले शोधले. पण मला बंगले सापडले नाहीत. आता मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले हरवलेत, यावर रश्मी ठाकरे, वायकर हे सगळे बोलतील. राऊत का बोलत आहेत?, असा सवाल त्यांनी केला. उद्या अलिबागला जाणार, बंगले नसतील, तर पोलिस स्थानकात तक्रार करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भातील एक ट्विट देखील किरीट सोमय्यांनी केलं आहे.
In January (& May) 2019 Rashmi Uddhav Thackeray wrote letter to Korlai Grampanchayat Alibag to transfer 19 Bungalow in Her Name
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 17, 2022
जानेवारी (आणि मे) 2019 मध्ये श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर 19 बंगले ट्रान्स्फर करण्यासाठी पत्र लिहिले pic.twitter.com/IWBcLGAL2g
जानेवारी आणि मे २०१९ मध्ये रश्मी ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर १९ बंगले ट्रान्सफर करण्यासाठी पत्र लिहिलं होतं, असं कॅप्शन देत किरीट सोमय्यांनी संबंधित पत्राचा पुरावाच ट्विट केला आहे. उद्या याच गावात जाऊन संबंधित जागेवर जर बंगले नसतील तर पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.