Kirit Somaiya: माझ्या बायकोला जाऊन विचारा, किरीट सोमय्या राऊतांवर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 03:06 PM2022-02-21T15:06:51+5:302022-02-21T15:07:18+5:30
सध्या महाराष्ट्रात भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसना नेते संजय राऊत यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे.
मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद विकोपाला पोहोचला आहे. संजय राऊत यांनी सोमय्यांबद्दल अपशब्द वापरले. दलाल या शब्दासह दुसऱ्या शब्दाचाही उल्लेख किरीट सोमय्यांचे नाव घेऊन राऊतांनी केला. संजय राऊतांच्या या शिवराळ भाषेवर सोमय्यांनी प्रथमच जाहीरपणे आक्षेप घेत संताप व्यक्त केला. तसेच, माझी पत्नी मराठी आहे, असेही सोमय्यांनी म्हटलं आहे.
सध्या महाराष्ट्रात भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसना नेते संजय राऊत यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. त्यात संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप करत असलेल्या सोमय्यांवर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरत असून, ते सोमय्यांवर शिवराळ भाषेत टीका करत आहेत. त्यावर, आता किरीट सोमय्यांनी संताप व्यक्त केला आहे.
'माझी पत्नी मराठी आहे, माझी सून बागायतकर असून तीही महाराष्ट्राची कन्या आहे. संजय राऊत ज्या शिव्या वापरुन माझा उल्लेख करतात, त्यांना भ** आणि दलाल या शब्दाचा अर्थ कळतो का?, माझ्या बायकोला-आईला जाऊन विचारा, असे सोमय्यांनी म्हटले. तसेच, राऊतांचे हे शब्द ऐकून माझी पत्नी-आई व्यथीत झाल्या आहेत. उद्धव ठाकरे हे राऊतांना का थांबवत नाहीत, तेच संजय राऊतांमार्फत शिवीगाळ करत आहेत,' असा गंभीर आरोपही सोमय्यांनी केला.
त्या भाषेचं राऊतांकडून समर्थन
जे महाराष्ट्रद्रोही आहेत. जे मराठी द्वेष्टे आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत. ज्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी कायम द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते त्या भाषेतच बोलावं. मुंबईत आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात जर कुणी महाराष्ट्रद्रोही एखाद्या राजकीय पक्षाचा बुरखा पांघरून आणच्यावर आणि महाराष्ट्रावर थुंकत असेल, तर आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरली आहे. आम्हाला कुणी मराठी शिकवू नये.