किरीट सोमय्या गुजरात किंवा गोव्यात लपले, संजय राऊतांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 05:33 AM2022-04-12T05:33:40+5:302022-04-12T05:33:57+5:30
गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या हे लपून बसल्याचा दावा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.
मुंबई :
गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या हे लपून बसल्याचा दावा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. महाराष्ट्र सरकारला जे लोक हवे असतात ते भाजपशासित राज्यांमध्येच लपून बसतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
‘आयएनएस विक्रांत’ बचाव मोहिमेच्या नावाखाली सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असून देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषयातही घोटाळे करणाऱ्या सोमय्या यांना दिलेली सुरक्षा केंद्र सरकारने तातडीने काढायला हवी. अशा माणसाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दिली आहे, ही दुर्दैवी बाब आहे.
आता लाज वाटत असेल तर केंद्राने ही सुरक्षा काढावी. ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली ५८ कोटी रुपये सोमय्या यांनी जमा केले. हा निधी राज्यपालांकडे देणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो निधी भाजपकडे दिला असल्याचे म्हटले जात आहे. सोमय्या स्वत: बुडतच आहेत आता सोबत पक्षालाही घेऊन बुडत आहेत, असेही राऊत म्हणाले.
सोमय्यांचे वकील अशोक मुंदर्गी यांचा युक्तिवाद
- दिलेल्या निधीची पावती दिली नसल्याची तक्रार माजी लष्कर अधिकाऱ्याची आहे.
- या मोहिमेत केवळ भाजपच सहभागी नव्हती, तर काँग्रेस व शिवसेनेचाही समावेश होता.
- पावती न मिळाल्याची तक्रार २०२२ मध्ये करण्यात आली.
- सोमय्या यांनी वैयक्तिकरीत्या ही मोहीम राबविली नव्हती.
- ‘पिता-पुत्रांना अटक करणार’ अशा मुलाखती देण्यात आल्या.
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवाद
- जर जमविलेला निधी ‘विक्रांत’ला भंगारात न काढण्यासाठी वापरण्यात आला नाही, तर जमविलेला निधी कुठे वापरण्यात आला?
- ‘विक्रांत’साठी केवळ सात कोटी रुपयांची आवश्यकता होती. जर ५७ कोटी जमविले होते तर जहाज भंगारात जाण्याची आवश्यकताच नव्हती.
- जेव्हा आरटीआय कार्यकर्त्याने या निधीसंदर्भात माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागविली, तेव्हा संबंधित निधी राज्यपालांकडे जमा झाला नसल्याचे निदर्शनास आले.