मुंबई - राज्यातील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. तर, विधानभवनातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे भाजपा नेते मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. तर, किरीट सोमय्यांनी 12 नेत्यांच्या नावाची यादी जाहीर करत हे घोटाळेबाज असल्याचं म्हटलंय.
लडेंगे और जितेंगे, डरेंगे नही, असं नवाब मलिक यांनी माध्यमांना म्हटलं आहे. तसेच अटक केली आहे, पण घाबरणार नाही. आम्ही लढू आणि जिंकू, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे सर्वच नेते त्यांच्या पाठिशी उभे असल्याचं दिसून आले. तर, भाजप नेते मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी लगेच ट्विट केलं. त्यामध्ये किरीट सोमय्या म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यानंतर आता नवाब मलिक आणि त्यानंतर शिवसेनेचे नेते अनिल परब असं, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील सर्व घोटाळेबाजांना हिशोब द्यावा लागेल. आता, सोमय्यांनी महाविकास आघाडीतील डर्टी डझन म्हणून 12 नावांची यादीच जाहीर केली आहे.
सोमय्यांनी जाहीर केलेली 12 नावे -
1. अनिल परब2. संजय राऊत3. सुजित पाटकर4. भावना गवळी 5. आनंद आडसुळ6. अजित पवार७. हसन मुश्रीफ8. प्रताप सरनाईक9. रविंद्र वायकर10. जितेंद्र आव्हाड 11. अनिल देशमुख12. नवाब मलिक