Join us  

Kirit Somaiya: किरीट सोमय्या नरमले, 'उद्धव ठाकरेंबाबत तशी विधानं करणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 6:34 PM

मी शिर्डीला जात असताना उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन बोललो.

मुंबई - भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पूत्र नील सोमय्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर फोटो पोस्ट करून त्यांनी उद्धव ठाकरेंना माफिया मुख्यमंत्री म्हटले. यावर शिंदे गटाकडून जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला. तसेच, शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी थेट किरीट सोमय्यांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंबद्दल अशा प्रकारची विधानं करू नये असे सोमय्यांना समाजवले. त्यावर, सोमय्यांनी होकार दिल्याची माहिती केसरकर यांनी दिली.  

उद्धव ठाकरेंनी मला, माझ्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. नवनीत राणांना तुरुंगात टाकले होते. यामुळे मी त्यांना माफियाच म्हणतो, असे किरीट सोमय्यांनी म्हटले होते. तर, केसरकर यांनी यावर आक्षेप घेत आमच्यात मतभेद असले तरी उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करायची नाही, असे ठरविलेले आहे. किरीट सोमय्या जे बोलले आहेत ते आक्षेपार्ह आहे. मी देवेंद्र फडणवीसांना आक्षेप कळविला आहे. त्यांना किरीट सोमय्यांना आवर घालण्यास सांगितले आहे. आमच्यात जे काही ठरले आहे, त्यानुसार भाजपा नेत्यांनी वागावे, असे फडणवीसांना सांगितले असल्याचे केसरकर यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता केसरकर यांनी किरीट सोमय्यांशी संवाद साधला आहे. त्यावर, सोमय्यांनी नरम होऊन ती शिस्त पाळली जाईल, असे आश्वासन दिले.

मी शिर्डीला जात असताना उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन बोललो. त्यावेळी, घडला प्रकार आणि किरीट सोमय्यांच्या विधानाबद्दल माहिती दिली. त्यानंतर, मी यासंदर्भात किरीट सोमय्यांना बोलतो, आपल्या बैठकीवेळी ते हजर नव्हते. त्यामुळे, त्यांना याची कल्पना नाही, असे फडणवीस यांनी म्हटल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली. तसेच, मी स्वत: किरीट सोमय्यांशी बोललो, त्यावेळी त्यांनीही यापुढे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत तशी विधानं करणार नाही, असा विश्वास सोमय्यांनी दिल्याचेही केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सोमय्या यांची जी लढाई सुरू आहे, अनिल परब वगैरे यांच्यासमवेतची ती सुरूच राहिल. मात्र, भाजप-शिवसेना एकत्र येत असताना चांगलं वातावरण निर्माण होत होईल, यासाठी कसोशीने प्रयत्न करेन, असेही सोमय्यांनी केसरकर यांना म्हटले. 

काय म्हणाले होते सोमय्या

मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्रीना हटविल्या बद्दल अभिनंदन केले, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले. परंतू यावरून शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. किरीट सोमय्या यांनी माफिया असा शब्द वापरणे चुकीचे असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले होते. 

टॅग्स :किरीट सोमय्याशिवसेनाउद्धव ठाकरेदीपक केसरकर