मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. त्यातूनच, खासदार संजय राऊत हेही किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत दाखले देत आहेत. किरीट सोमय्यांनी आता पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची चौकशी होणार असल्याचा दावा केला आहे. मनी लाँड्रींगप्रकरणी ही चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांची मालमत्ता जप्त झाली. खासदार भावना गवळी यांच्यावर कारवाई झाली. श्रीधर पाटणकर याची प्रॉपर्टी जप्त झाली. रश्मी ठाकरे यांच्या 19 बंगल्याचे इन्वेस्टिगेशन सुरु आहे. उद्धव ठाकरे यांचे अनेक पार्टनर जेलमध्ये आहेत. मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक जेलमध्ये आहेत. हे मी भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढली त्याचे यश आहे, असे किरीट सोमय्यांनी म्हटले. तसेच, आता 7 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेलच असा दावाच सोमय्यांनी केला आहे.
दरम्यान, ठाकरे सरकारवर मी एकूण २६ आरोप केले होते. त्यातील ८ प्रकरणामध्ये ठाकरे सरकारला ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करावे लागले किंवा त्याचे पैसे परत करावे लागले आहेत. तर बाकीच्या १८ प्रकरणांमध्ये कारवाई चालू आहे. आता, 100 कोटींचा शौचालय घोटाळा लवकरच बाहेर येणार, असेही त्यांनी म्हटले आहे.