मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेते किरीट सोमय्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. किरीट सोमय्या हे दलाल, लफंगा, चोर आहेत. ते स्वत:च्याच चपलेनं मार खाणार आहेत. तसेच लोक त्यांची धिंड काढतील. सोमय्या पुढे आणि लोक मागे असं चित्र दिसेल. सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावे कोट्यवधी रुपये उकळले आहेत. तसेच अमित शाहांची भीती दाखवूनही वसुली केली आहे, असा आरोप आज संजय राऊत यांनी केला. तसेच सोमय्यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत माझ्याकडे ट्रकभर पुरावे आहेत. आता या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या सत्रादरम्यान, आज संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर अजून गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात २५ हजार कोटी रुपयांचा महाआयटी घोटाळा झाला होता. या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाले होते. या महाआयटी घोटाळ्यातील प्रमुख लोकांना पळवून लावले गेले. अमोल काळे, ढवंगाळे यांच्यासह इतर व्यक्ती कुठे आहेत हे आम्ही केंद्राला विचारणार आहोत.
यावेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर अजून गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, किरीट सोमय्या हे चप्पल दाखवताहेत. पण एका दिवशी किरिट सोमय्या हे स्वत:च्याच चपलेने मार खातील. ते पुढे आणि लोक मागे असं चित्र दिसेल. लोक त्यांची कपडे काढून ढिंड काढतील. किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या नावे कोट्यवधी रुपये उकळले आहेत. पवई पेरुबाग झोपडपट्टी पुनर्वसनाच्या यादीवर फडणवीसांची सही घेण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण बोगस आहे. तब्बल ४३३ लोकांकडून २५-२५ लाख रुपये घेतले गेले. एजंटच्या माध्यमातून. २००-३०० कोटींचा हा व्यवहार झाला. याबाबत ट्रकभर कागद माझ्याकडे आहेत. आहेत. पुनर्वसनाच्या कागदावर सही करायची असेल तर फडणवीसांना ५० कोटी द्यावे लागतील, असे सांगून किरीट सोमय्यांनी पैसे उकळले. यामध्ये ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा घोटाळा झाला अशी आमची शंका आहे. याबाबत ईकॉनॉमिक ऑफेन्स विंग, ईडी यांनी लक्ष घालावं, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
किरीट सोमय्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत आतापर्यंत २११ प्रकरणं माझ्याकडे आल्या आहेत. आता दररोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आणणार आहे. किरीट सोमय्यांनी आतापर्यंत साडे सात हजार रुपये वसूल केले आहेत. किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावे शेकडो कोटी रुपये उकळले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या नावावर धमक्या देऊनही पैसे उकळले आहेत. हे रेकॉर्डवर आहे. काय करायचे ते करा. उखाडना है तो उखाड लो, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.