"मला न विचारताच घोषणा"; सोमय्यांनी पक्षादेश नाकारला, म्हणाले, "तीन वेळा हल्ले झाले तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 08:23 PM2024-09-10T20:23:10+5:302024-09-10T20:59:26+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दिलेली जबाबदारी नाकारत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Kirit Somaiya rejected the responsibility given by BJP for the assembly elections | "मला न विचारताच घोषणा"; सोमय्यांनी पक्षादेश नाकारला, म्हणाले, "तीन वेळा हल्ले झाले तरी..."

"मला न विचारताच घोषणा"; सोमय्यांनी पक्षादेश नाकारला, म्हणाले, "तीन वेळा हल्ले झाले तरी..."

Kirit Somaiya : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं आहे. निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र आता ही जबाबदारी स्विकारण्यास किरीट सोमय्या यांनी स्पष्ट नकार दिला आहे. आपण ही जबाबदारी दुसऱ्या कुणाला तरी द्यावी असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने व्यवस्थापन समिती जाहीर केली. रावसाहेब दानवे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये निवडणूक संपर्क प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

मात्र आता या नियुक्तीवरुन किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी, असे सोमय्या यांनी म्हटलं. सामान्य सदस्य म्हणून ठाकरे सरकारचे घोटाळे काढले. त्यावेळी तीन वेळा माझा वर जीवघेणे हल्ले झाले, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.

"आपण विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला हे अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी भाजप-शिवसेनेची ब्ल्यू सी हॉटेल वरळी इथं संयुक्त पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषदेतून जाण्यास सांगितलं होतं. तेव्हापासून मी भाजपचा एक सामान्य सदस्य, कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मधल्या काळात मी ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी स्वीकारली होती. माझ्यावर तीनवेळा जीवघेणे हल्लेही झाले. तरीही मी ही जबाबदारी पार पाडली. गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात ते पुरेसे आहे," असं किरीट सोमय्या  यांनी म्हटलं आहे.

"मी विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतोय आणि करत राहणार आहे. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण आणि प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक देऊ नये," असंही सोमय्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Kirit Somaiya rejected the responsibility given by BJP for the assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.