Join us

Mumbai Cruise Drug Case: “CM ठाकरे, पवारांच्या इशाऱ्यावर मलिक हे वानखेडेंची बदनामी करतायत”; भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 1:58 PM

Mumbai Cruise Drug Case: समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे, असा आरोप करण्यात येत आहे.

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणावरून (Mumbai Cruise Drug Case) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सातत्याने आरोप करताना पाहायला मिळत आहेत. यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. समीर वानखेडे यांची बाजू घेत भाजपकडून मलिकांसह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांवर टीका करण्यात येत आहे. यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (CM Uddhav Thackeray) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरून नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर टीका करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला असून, समीर वानखेडे यांच्या पत्नीशी माझे बोलणे झाले आहे. ते आणि त्यांचे सासरे मला भेटायला येणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही. आयकर विभागाला अनेक गोष्टी सापडल्या आहेत, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

समीर वानखेडे प्रकरण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ट्रिक

समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. जात काढली जाते, बाप काढला जातो, हे चुकीचे असून, ठाकरे सरकार चुकीचे वागत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना हे शोभत नाही. नवाब मलिक यांनी कोर्टात जावे. कोर्ट काय तो निर्णय घेईल. तुम्ही दिशाभूल का करत आहात, अशी विचारणा करत तुमचे घोटाळे बाहेर काढल्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी समीर वानखेडेंना टार्गेट केले जात आहे, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला.

ही सगळी ठाकरे सरकारची बदमाशी

महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे दाबण्यासाठीच समीर वानखेडे प्रकरणाची चर्चा सुरु आहे. गेले १२ दिवस झाले समीर वानखेडे दलित की मुस्लिम हा वाद सुरु आहे. अजित पवारांवर ११ दिवस धाडी सुरु होत्या. त्यांना वाचवण्यासाठीच हे प्रकरण सुरु करण्यात आले. ही सगळी ठाकरे सरकारची बदमाशी सुरु असून, शरद पवार यांनी स्पष्ट केले की, अजित पवारांकडे चिल्लर सापडली. पण बिल्डरकडे १८० कोटी सापडले, त्याच बिल्डरने अजित पवारांना १०० कोटी रुपये दिले आहेत. अजित पवारांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. अजित पवार सिंचन घोटाळ्यात आरोपी आहेत. चार्जशीटमध्ये त्यांचे नाव आहे. त्यावरील कारवाई या सरकारने थांबवली आहे, असा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.  

टॅग्स :मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीनवाब मलिकशरद पवारउद्धव ठाकरेकिरीट सोमय्यासमीर वानखेडे