Kirit Somaiya: दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतानाच भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याला १ जानेवारीपर्यंत भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याची घोषणा केली आहे. ते आज एका दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.
"ज्या पद्धतीनं मोदींनी देशातील सर्वांचं ३१ डिसेंबरपर्यंत कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. १ जानेवारी रोजी भारत कोविडमुक्त असणार आणि आमचं तर महाराष्ट्रासाठी कमिटमेंट आहेच. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील ४० चोरांचे घोटाळे काढून १ जानेवारीला महाराष्ट्र घोटाळामुक्त असेल. दिवाळी आज आहे. परंतु पाडवा १ जानेवारी रोजी असेल", असं किरीट सोमय्या म्हणाले.
सोमय्यांनी नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप केला आहे. ठाकरे सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आर्थिक व्यवहार, उलाढाल आश्चर्य उत्पन्न करणारी आहे. तसेच पवारांचे मित्र, बिल्डरांकडून अजित पवार आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची (शंभरहून अधिक) अपारदर्शक नामी आणि बेनामी आवक असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. मोहन पवार हे जरंडेश्वर साखर कारखान्याचे एक मालक आहेत. पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली होती.