Join us

Kirit Somaiya: शिवसेनेची किरीट सोमय्यांविरोधात तक्रार; शिवसैनिकांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 1:53 AM

जोपर्यंत खार पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर घटनास्थळावरून हलणार नाही असा पवित्रा किरीट सोमय्या यांनी घेतला आहे.

मुंबई – शहरात पुन्हा एकदा भाजपाविरुद्धशिवसेना(Shivsena vs BJP) असा संघर्ष सुरू झाला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्या यांच्या गाडीची काच फुटून त्यांना दुखापत झाली. या हल्ल्यानंतर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. शिवसैनिकांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते वांद्रे पोलीस स्टेशनबाहेर जमले. यावेळी शिवसेनेविरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती.

मात्र आता शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर(Vishwanath Mahadeshwar) यांनी या किरीट सोमय्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोमय्या यांनी शिवसैनिकांवर गाडी घातल्याचा आरोप महाडेश्वर यांनी केला आहे. तर शिवसैनिकांनी गाडीवर हल्ला केला नाही असं ते म्हणाले. सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर पोलीस उद्धव ठाकरेंच्या घरचे नोकर आहेत का? जोपर्यंत खार पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर घटनास्थळावरून हलणार नाही. जोपर्यंत मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे घटनास्थळी पोहचत नाहीत तोवर जागा सोडणार नाही. माझी हत्या करण्यासाठी हल्ला करण्यात आला असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.  

केंद्रीय गृहमंत्री, गृह सचिवांना पत्र लिहिणार

किरीट सोमय्या यांचावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी" होम सेक्रेटरी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहिणार असून जबाबदारी न पाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) करणार आहे. फडणवीस म्हणाले की, किरीट सोमय्या हे झेड प्रोटेक्शनमध्ये आहेत. किरीट सोमय्या यांनी अधिकृतपणे पोलिसांना कळवलं होतं मी भेटायला येत आहे. भेट झाल्यानंतर खार पोलीस स्टेशनबाहेर ७० ते ८० जणांचा जमाव असून तो माझ्यावर हल्ला करणार आहे. तुम्ही रोड क्लिअर करा, मी बाहेर जातो असंही पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांनी कुठलीही कार्यवाही न करता शिवसैनिकांच्या गुंडांना हल्ला करण्याची परवानगी दिली असा आरोप फडणवीसांनी केला.

टॅग्स :किरीट सोमय्याशिवसेनाभाजपा