Kirit Somaiya, Uddhav Thackeray : Yashwant Jadhav हे उद्धव ठाकरेंचे शागिर्द, त्यांनी छगन भुजबळांनाही मागे टाकलं"; किरीट सोमय्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 08:28 PM2022-03-05T20:28:38+5:302022-03-05T20:29:25+5:30
मुख्यमंत्र्यांनी पैसे खाल्ल्यामुळेच मुंबई पावसात बुडाली, असंही सोमय्या म्हणाले.
Kirit Somaiya Uddhav Thackeray Yashwant Jadhav : मुंबई महापालिकेचे स्थायी समिती (BMC Standing Committee) अध्यक्ष यशवंत जाधव गेल्या काही दिवसांपासून कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चर्चेत आहेत. तशातच भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यशवंत जाधव यांच्यावर शनिवारी घणाघाती आरोप केले. "यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे शागिर्द आहेत, त्यांनी छगन भुजबळांनाही (Chhagan Bhujbal) मागे टाकलं. जाधव यांनी १०० कोटींचं मनी लॉन्ड्रिंग केलं" असा थेट आरोप सोमय्यांनी यशवंत जाधव यांच्यावर केला. १०० कोटींचं मनी लॉड्रिंग, १०० रुपयांचा शेयर १० हजार रुपयांना कोलकाताच्या कंपनीने घेतले, १०० कोटींचे शेयर आर्मस्ट्राँग कंपनीच्या खात्यात आले, असा आरोपही सोमय्यांनी केला.
एका रुपयाचा शेअर कोलकात्यातील कंपनीला ५०० रुपयांना विकण्यात आला. या घोटाळ्यात IAS अधिकारीही आहेत. १५ कोटींचा फुलप्रुफ घोटाळा प्रधान डिलर्स प्रा. लि. कंपनीने केला आहे. २० ऑक्टोबर २०१२ रोजी कंपनी स्थापन झाली आणि ३० ऑक्टोबरला १५ कोटींचा व्यवहार झाला, या गोष्टी सोमय्यांनी निदर्शनास आणून दिल्या. तसेच, हे सर्व व्यवहार उदय शंकर महावर (Uday Shankar Mahavar) च्या मदतीने झाले व उदय शंकर महावर हा गांधी कुटुंबाच्या जवळचा व्यक्ती असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी पैसे खाल्ल्यामुळेच मुंबई पावसात बुडाली!
"अवघ्या काही लाखांच्या किमतीत यशवंत जाधव यांच्या कुटुंबांच्या नावावर २०२० मध्ये कंपनी करण्यात आली. यात १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला. घाटकोपर, हिंदमाता येथील नाले सफाईच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे मुख्यमंत्र्यांनी खाल्ले आणि त्यामुळे मुंबई पावसात बुडाली", असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनीउद्धव ठाकरेंवर केला. "यात ५०० कोटीचं मनी लॉन्ड्रिंग झालं. उद्धव ठाकरे सोनिया गांधींकडे गेले, यामागे उदय शंकर महाराव हे सूत्रधार होते. तीन एजन्सींकडून या अपहाराची चौकशी व्हावी", अशी मागणी सोमय्यांनी केली.
"नील सोमय्यांना अटक न केल्यामुळेच हेमंत नगराळे यांची बदली झाली"
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नील सोमय्या यांना जेलमध्ये टाकलं नाही म्हणून त्यांची बदली करण्यात आली, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. "आम्हाला मातोश्रीवरून माहिती मिळत असते. सात दिवसांत कारवाई केली नाही तर पाहा, असं त्यांना सांगण्यात आलं होतं", असाही दावा सोमय्यांनी केला.