Join us

"किरीट सोमय्यांचे आरोप राजकीय चेटकिणीसारखे, त्यांना विरोधकांवर खोटेनाटे आरोप करण्याचा रोग जडलाय" काँग्रेसची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 3:45 PM

Congress Criticize Kirit Somaiya: गाव खेड्यात दुसऱ्याचे नुकसान व्हावे, त्यांना त्रास व्हावा या कुहेतूने बाहुल्या बनवून त्याला लिंबू, मिरची, हळद, कूंकू, टाचण्या, टोचणाऱ्या चेटकीणीसारखी सोमय्या यांची अवस्था आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

मुंबई  -  भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. गाव खेड्यात दुसऱ्याचे नुकसान व्हावे, त्यांना त्रास व्हावा या कुहेतूने बाहुल्या बनवून त्याला लिंबू, मिरची, हळद, कूंकू, टाचण्या, टोचणाऱ्या चेटकीणीसारखी सोमय्या यांची अवस्था आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

सोमय्या यांचा समाचार घेताना अतुल लोंढे म्हणाले, सोमय्या यांना प्रसिद्धीत राहण्याचा एक रोग जडला आहे. टीव्ही वर चेहरा दिसला नाही तर ते अस्वस्थ होतात. सतत प्रसिद्धीचा झोत आपल्यावर रहावा यासाठी काहीतरी पेपर घेऊन पुरावे असल्याची बोंबाबोंब करायची त्यांना सवय जडली आहे. त्यांचे आरोप हास्यास्पद,  तर्कहिन व केराच्या टोपलीत टाकण्याच्या लायकीचे असतात. याच किरीट सोमय्या यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर हवाला, मनिलॉंड्रिंगचे आरोप केले होते, बोगस कंपन्यांच्या माध्यमातून पैसे कमावल्याचे आरोप केले, त्याचे पुढे काय झाले. नारायण राणे आता भाजपात आहेत. भारतीय जनात पक्षात प्रवेश करावा यासाठी हे प्रकार सुरु आहेत का? सत्ता नसल्याने भाजपाने सोमय्या यांना विरोधकांवर खोटेनाटे आरोप करण्यासाठी मोकाट सोडले असून त्यांचे आरोप हे दखल घेण्यायोग्यही नसतात.

भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या आधी असेच टू जी स्पेक्ट्रम, कोळसा व्यवहार यासंदर्भात लाखो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. आरोपांची राळ उडवून युपीए सरकारला बदनाम केले परंतु नंतर या प्रकरणात सर्वजण निर्दोष ठरले. भाजपाने केलेले आरोप चुकीचे व तकलादू होते हे सिद्ध झाले, त्या आरोपाने फक्त सणसणाटी निर्माण करुन काही नेत्यांची नाहक बदनामी झाली. सोमय्या आज तेच करत आहेत. त्यांच्या आरोपांना काडीचीही किंमत नाही, मीडिया व लोकांनीही आता त्याकडे दुर्लक्ष करावे असे अतुल लोंढे म्हणाले.

टॅग्स :किरीट सोमय्याभाजपाकाँग्रेसमहाविकास आघाडी