मुंबई : पवई मुंबई येथे एसआरए घोटाळ्यात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ४०० कोटी रुपये लाटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे शेकडो कोटींची वसुली सोमय्यांनी केली आहे, असा आरोप शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी गुरुवारी केला.
पवई आयआयटीजवळील पेरूबाग येथील पुनर्वसन प्रकल्पात सोमय्या यांनी ४३३ बोगस लोकांना प्रकल्पात घुसवले. या सर्व बोगस लाभार्थ्यांकडून सोमय्यांच्या एजंटनी प्रत्येकी २५ ते ५० लाख घेतले. या पुनर्वसन प्रकल्पात बोगस लाभार्थ्यांना स्थानिक रहिवासी दाखविण्यासाठी बनवाट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांचा आधार घेण्यात आला. स्वत: तेथील स्थानिक लोक माझ्याकडे तक्रार घेऊन आले आहेत. या घोटाळ्याचे ट्रक भरून पुरावे आपल्याकडे आहेत. या घोटाळ्यातील कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागालाही या कागदपत्रे देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
अमित शहा, फडणवीस यांना त्यांच्या नावावर सोमय्या पैसा जमा करीत असल्याचे माहिती नसावी, पण त्यांच्या नावे केलेल्या या घोटाळ्याची सर्व कागदपत्रे मी तपास संस्थांना दिली आहेत. मी रोज भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार आहे. लोकच येऊन माहिती देत असून एकूण २११ प्रकरणे आली आहेत, असे राऊत म्हणाले.
माझ्याकडे पुरावे, राऊतांकडून मनोरंजन - सोमय्या
मी पुराव्यांशिवाय एकही आरोप करत नाही. आरोपांच्या नावाखाली खा. संजय राऊत हे सध्या महाराष्ट्राचे मनोरंजन करीत आहेत. त्यांनी आधीच दोन सिनेमे काढले. मनोरंजन हा त्यांचा विषय आहे, असा पलटवार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्या हे शुक्रवारी अलिबाग व कोर्लईत जाणार असल्याने राजकीय राड्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोमय्या म्हणाले की, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सरकारला द्यावेत. केवळ माध्यमांसमोर आरोप करू नयेत. मी कोणतेही आरोप करताना त्याचे सबळ पुरावे देतो. माध्यमांनी एखादा व्यक्ती आरोप करत असेल तर त्याचे पुरावे संबंधित व्यक्तीकडे आहेत का, याची पडताळणी करुन घ्यायला हवी. त्यानंतरच बातम्या दाखवाव्यात. कारण राऊतांकडून माध्यमांचा गैरवापर केला जात आहे. राऊतांकडे जर माझ्या किंवा माझ्या मुलाविरोधात पुरावे असतील तर ते कोर्टात द्यावेत. सरकार त्यांचेच आहे, असे आव्हानही सोमय्या यांनी दिले. उद्धव ठाकरेंच्या नावावरचे कोर्लईतील १९ बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये पत्र लिहून माझ्या नावावर बंगले करा, असे सांगितले होते. मी या बंगल्यांबाबत काहीच बोललो नाही. पण संजय राऊतांनीच हा विषय उकरून काढला आहे.