मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर 57 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर, मुंबईतील ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ४२०, ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली. राऊत यांचा दादरमधील फ्लॅट आणि अलिबाग येथील काही जमीन ही स्थावर मालमत्ता जप्त केली. त्यानंतर, संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, मी मध्यमवर्गीय माणूस असून माझ्याकडे बेकायदेशीर प्रॉपर्टी असेल तर मी ती भाजपला दान देईन, असे राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोपही केला. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा गेला कुठे?असा सवाल राऊत यांनी विचारला.
संजय राऊत म्हणाले की, 2019 मध्ये भाजपने आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली होती आणि लोकांकडून पैसे गोळा केले होते. हे पैसे राजभवनात जमा करायचे होते आणि तेव्हा किरीट सोमय्या यांनी राजभवनात पैसे जमा करण्याबाबत बोलले होते. मात्र, त्यांनी राजभवनाकडून माहिती मागवली असता, तसे पैसे मिळाले नाहीत. हा 57 कोटींचा घोटाळा असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली होती आणि किरीट सोमय्यांनी ठेवलेल्या पैशाचा वापर त्यांच्या व्यवसायासाठी केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या ट्रॉम्बे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
बाप-बेटा जेलमध्ये जाणारच - राऊत
संजय राऊतांनी या संदर्भात आज पुन्हा एक ट्विट करत सोमय्यांना इशारा दिला आहे. Mark my word...INS विक्रांत चया नावे ५६ कोटी गोळा करून जनतेला देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेटा यांना जेलमध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपाला जाब विचाराच लागेल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.