मुंबई - INS विक्रांत निधी संकलन प्रकरणात सत्र न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. सोमय्या पिता पुत्रांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. सोमय्यां हे गोवा किंवा गुजरातला लपले असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आता, राऊत यांच्या आरोपवर स्वत: किरीटो सोमय्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत उत्तर दिलंय.
किरीट सोमय्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहेत. त्यांनी व्हिडिओ शेअर करत राऊत यांना लक्ष्य केले आहे. तसेच, तुम्हीही किती खोटे आरोप केले, तरी आम्ही ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणारच, असा इशाराही त्यांनी दिलाय.
सोमय्या गुजरात किंवा गोव्यात- संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांबाबत महत्वाचा दावा केला आहे. गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या लपून बसल्याचा दावा राऊतांनी केलाय. महाराष्ट्र सरकारला जे लोक हवे असतात ते भाजपशासित राज्यांमध्येच लपून बसतात, असंही राऊत म्हणाले.
'दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि...'
किरीट सोमय्या यांच्याबाबत माध्यमांशी बोलताना वळसे पाटील म्हणाले की, ''किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने 'झेड' दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे, त्यांच्या ठावठिकाणाबाबत आम्ही केंद्राकडे विचारणार करणार,'' अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच, "दुसऱ्यांवर आरोप करायचे आणि स्वत:वर आरोप झाले की, चौकशीला सामोरे जायचे नाही. हे काही शूरपणाचे लक्षण नाही,'' असा टोलाही वळसे पाटलांनी लगावला.