Join us

Kirit Somaiyya: "हातोडे घेऊन फिरत होता, आता 'हा' कमळातला चिखल कोठे गेला?"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 7:43 AM

किरीट सोमय्यांचे पुत्र नील यांच्या जामिन अर्जावरील निकाल उद्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे.

मुंबई - आयएनएस विक्रांत या युद्धनौकेसाठी पैसे गोळा केल्याच्या आरोपांमुळे भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या अडचणीत आले आहेत. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने किरीट सोमय्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळण्यापूर्वीच किरीट सोमय्या फरार झाले आहेत. त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल येत आहे. त्यावरुन, शिवसेना नेत्यांनी सोमय्यांवर कडक शब्दात निशाणा साधला आहे. 

किरीट सोमय्यांचे पुत्र नील यांच्या जामिन अर्जावरील निकाल उद्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. सोमय्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, सध्या दोघेही फरार असल्याने शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या गुजरात किंवा गोव्यात लपल्याचे म्हटले आहे. तर, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही बोचरी टीका केली आहे. 

प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून दाखवून हातोडे घेऊन फिरत होता. आता ‘नॉट रिचेबल’ का? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यापासून किरीट सोमय्या पुत्रासह फरार आहेत. त्यावरुन, पेडणकेर म्हणाल्या की, “हा कमळाचा चिखल गेला कोठे? प्रत्येकवेळी दुसऱ्यांवर बोटं दाखवून हातोडे घेऊन फिरत होता. आता का ‘नॉट रिचेबल’ झाला. आम्ही नेहमीच सांगतो की कागद आणि कायद्याची लढाई आहे. आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. त्या संविधानाप्रमाणे आपण लढू. मात्र, महाराष्ट्रात किरीट सोमय्या हे असं कॅरेक्टर तयार झालंय जे फक्त भोंगा घेऊन बोंबलतं.”, अशा तीव्र शब्दात किशोरी पडणेकर यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला. 

काय म्हणाले संजय राऊत

गुजरात किंवा गोवा या भाजपशासित राज्यांमध्येच भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या हे लपून बसल्याचा दावा शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. महाराष्ट्र सरकारला जे लोक हवे असतात ते भाजपशासित राज्यांमध्येच लपून बसतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ‘आयएनएस विक्रांत’ बचाव मोहिमेच्या नावाखाली सोमय्या यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असून देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषयातही घोटाळे करणाऱ्या सोमय्या यांना दिलेली सुरक्षा केंद्र सरकारने तातडीने काढायला हवी. अशा माणसाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दिली, ही दुर्दैवी बाब आहे.  

टॅग्स :किशोरी पेडणेकरकिरीट सोमय्यागुन्हेगारीपोलिसन्यायालय