मुंबई - साई रिसोर्ट प्रकरणात माझा काही संबंध नाही असं मी सुरुवातीपासून सांगत होतो. जाणून बुजून खोटे आरोप केले गेले. या रिसॉर्टच पाणी समुद्रात जाते म्हणून इडीने आमची चौकशी केली आणि दीड वर्ष नाहक बदनामी झाली. मी हायकोर्टात खटला दाखल केला आहे. सोमय्या नेहमी आरोप करतात आणि आरोप अंगलट येतायत लक्षात आले की सोडून देतात. सोमय्या यांना एकतर नाक घासावं लागेल किंवा १०० कोटींचा केलेला दावा, त्यानुसार १०० कोटी द्यावे लागतील असं विधान ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे.
अनिल परब म्हणाले की, आम्ही हे प्रकरण बेदखल करतोय असं न्यायमूर्तींनी सांगितले तर आपली अब्रू जाईल म्हणून सोमय्यांनी माघार घेतली. समुद्रात सांडपाणी जाते अशी गोष्ट रचली गेली. पण जे रिसॉर्ट सुरू झालेले नाही आहे त्याचे सांडपाणी समुद्रात जाईल कसे असा रिपोर्ट सगळ्यांनी दिला आहे. अर्धी इमारत असताना पूर्ण इमारतीचा टॅक्स घेतला असा गुन्हा दाखल केला पण तोही खोटा गुन्हा आहे. आम्ही ते हायकोर्टात सिद्ध करू. एकतर या याचिकासुद्धा मागे घेतल्या जातील किंवा आम्ही निर्दोष सिद्ध होऊ. सर्व केसेसमध्ये मला न्याय मिळेल यावर माझा विश्वास आहे असंही त्यांनी सांगितले.
'त्यांना' स्वत:चा आवाज उरला नाहीखासदार गजानन किर्तीकर यांच्या विधानावर अनिल परब म्हणाले की, जे तिकडे गेलेत त्यांच्याकडे स्वतःचा आवाज उरलेला नाही. आता आमदारांच्या अपत्रतेचा निर्णय भाजपाच्या दारात आहे. त्यामुळे त्यांचे ऐकणे शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना भाग आहे. जे बाळासाहेबांचा वारसा घेऊन गेले आहेत त्यांच्यातले किती जण भाजपाकडून लढत आहेत ते कळेल असा टोलाही अनिल परबांनी लगावला. दरम्यान, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा ते पक्षप्रमुख ठरवतील. महविकास आघाडीने ही जागा लढली तर आम्ही जिंकू हे निश्चित असा विश्वासही अनिल परबांनी व्यक्त केला.