सुषमा अंधारेंकडून किरीट सोमय्यांची मिमिक्री, बंडखोर आमदारांना केलं लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 04:18 PM2022-11-03T16:18:37+5:302022-11-03T16:19:31+5:30
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे.
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेतून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे बंडखोर आमदारांवर आणि भाजप नेत्यांवर जोरदार टिका करत आहेत. यावेळी, बंडखोर आमदारांनी पक्ष सोडताना दिलेल्या कारणांवरुन त्यांनी आमदार यामिनी जाधव यांच्यावर टीका केली. शिवसेनेतील फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून, बंडखोरांवर सातत्याने अंधारे तोफ डागत आहे. यातच शिंदे गटातील एक आमदार आमच्या संपर्कात असून, आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. तर, एका सभेत चक्क भाजप नेते किरीट सोमय्या यांची मिमिक्रीही करुन दाखवली.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. बंडखोरांना अद्दल घडवण्यासाठी काही मंडळींना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश देत शिवबंधन बांधले. यातील एक नाव म्हणजे शिवसेनेत प्रवेश करताच उपनेतेपद मिळालेल्या सुषमा अंधारे. सध्या महाप्रबोधन यात्रेतून त्या सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. यामिनी जाधव यांच्यावर टिका करताना पंकजा मुंडेंचं उदाहरण अंधारे यांनी दिलं. आजारी असताना पक्षप्रमुखांनी साधी विचारपूसही केली नाही, हा आरोप करत यामिनी जाधव पक्ष सोडून गेल्याचं सांगतात. जाधव यांनी केवळ या गोष्टीचं भांडवल केलं असं सांगत सुषमा अंधारे यांनी म्हटलं. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यसंस्काराला भाजप नेते आणि पंतप्रधान आले नाहीत. पण, या गोष्टीचं पंकजा मुडेंनी भांडवल केलं नाही, त्यांनी पक्ष सोडण्याची भाषा केली नाही, असं उदाहरणच सुषमा अंधारे यावेळी दिलं.
किरीट सोमय्यांची मिमिक्री
जळगाव येथील महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंनी किरीट सोमय्यांची मिमिक्री करताना शिवसेना खासदार भावना गवळीचं नाव घेतलं. सोमय्यांच्या स्टाईलने त्यांनी भावना गवळींवर जोरदार प्रहार केला. ज्या भावना गवळी इकडे असताना माफिया होत्या, त्या तिकडे गेल्यानंतर मोदींच्या बहिणबाई कशा झाल्या, सांगा मला.. असे म्हणत किरीट सोमय्यांची नक्कल केली. तसेच, भाजपकडे असा कुठला अल्लाहदीनचा दिवा आहे, जो घासला की इकडचा भ्रष्टाचारी माणूस तिकडे स्वच्छ होतो, असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारला.
आम्ही परतीचे दोर कापले नाहीत
सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणल्या की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत. आम्ही टीका करताना कधीही पातळी सोडणार नाही. परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नाहीत, असे सूचक विधान सुषमा अंधारे यांनी केले. तसेच हिंदुत्वावर भूमिका स्पष्ट करताना, मला सर्व धर्माबाबत आदर आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमधील परिषदेत हिंदुत्व सांगितले ते महत्त्वाचे आहे, असे सुषमा अंधारे यांनी नमूद केले.