कीर्तिकर ईडीच्या फेऱ्यात, बाकी उमेदवाराच्या शोधात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 01:16 PM2024-04-13T13:16:43+5:302024-04-13T13:17:56+5:30
या मतदारसंघात उमेदवारी द्यायची कोणाला आणि प्रचार तरी कसा करायचा, या विवंचनेत शिंदेसेना आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर करून उद्धवसेनेने आघाडी घेतल्यानंतर त्यांच्यावर लगेचच ईडीची नोटीस बजावण्यात आली. गेल्या आठवड्यात त्यांची आठ तास चौकशीही झाली. कीर्तिकरांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवून प्रचाराला वेळ मिळू न देण्याची व्यूहनीती असली तरी येथे त्यांच्या तोडीस तोड उमेदवार शोधण्यात शिंदेसेना अजूनही चाचपडत असल्याचे चित्र आहे.
चित्रपट अभिनेते गोविंदा यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला खरा, मात्र त्यांच्या नावाला स्थानिकांनीच विरोध केल्याने त्यांचे नाव मागे पडले. त्यामुळे १८ लाख लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघात उमेदवारी द्यायची कोणाला आणि प्रचार तरी कसा करायचा, या विवंचनेत शिंदेसेना आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी प्रचारात आघाडी घेतली.
त्यांनी जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, गोरेगाव आणि दिंडोशी या सहा विधानसभा क्षेत्रात शाखांच्या बैठका घेतल्या.
माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी उमेदवारीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. त्यांनी बायोडेटा देखील दिल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदेसेनेकडून आमदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी मनीषा वायकर, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले संजय निरूपम, अभिनेते शरद पोंक्षे, सचिन खेडेकर इत्यादींच्या नावांची चाचपणी सुरू आहे.
वायकर दाम्पत्याला स्थानिक भाजपचाच विरोध आहे. निरूपम यांच्याऐवजी मराठी उमेदवाराला प्राधान्य द्यावे, असाही मतप्रवाह असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.