Kisan Long March : बळीराजाचे ‘बळ’, ८० टक्के मागण्या मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 05:02 AM2018-03-13T05:02:57+5:302018-03-13T05:02:57+5:30

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईत पायी धडकलेल्या देशाच्या पोशिंद्याचा आवाज अखेर सोमवारी शासनदरबारी पोहोचलाच.

Kisan Long March: 'Balraj' for the Believers, 80 percent of the demands are approved | Kisan Long March : बळीराजाचे ‘बळ’, ८० टक्के मागण्या मंजूर

Kisan Long March : बळीराजाचे ‘बळ’, ८० टक्के मागण्या मंजूर

Next

- चेतन ननावरे 

मुंबई : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी नाशिकहून मुंबईत पायी धडकलेल्या देशाच्या पोशिंद्याचा आवाज अखेर सोमवारी शासनदरबारी पोहोचलाच. किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने आझाद मैदानावर एकवटलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी समाजाच्या सुमारे ८० टक्के मागण्या मंजूर करण्यात आल्या. त्यानंतरच आंदोलकांनी मैदान सोडले.
दरम्यान, दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने सोमवारी सकाळी सोमय्या मैदानाहून निघणा-या किसान मार्चने रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास आझाद मैदानाच्या दिशेने कूच केली. महत्त्वाची बाब म्हणजे आंदोलकांना आझाद मैदानापर्यंत जाण्यासाठी विशेष बेस्ट बसेस आणि पोलिसांच्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या सुविधेला लाथाडत लाल बावट्याने पायी चालणेच पसंत केले. मध्यरात्री परळ, लालबाग, भायखळा आणि जेजे उड्डाणपुलावरून मजल-दरमजल करीत पहाटे सव्वा पाच वाजता हजारोंच्या संख्येने आंदोलक मैदानात पोहोचले.
सकाळी शिष्टमंडळ चर्चेला जाणार असून त्यात मागण्या मान्य झाल्या नाही, तर विधान भवनाच्या दिशेने कूच करण्याच्या सूचना रात्रीच आंदोलकांना देण्यात आल्या होत्या. गोळीबार होवो किंवा लाठीचार्ज, जीव गेला तरी मुंबई सोडायची नाही, असा पवित्रा मैदानातील प्रत्येक आंदोलकाच्या मुखातून ऐकायला मिळाला. अखेर दुपारी सव्वा बारा वाजता शेतकºयांचे शिष्टमंडळ भेटीसाठी विधान भवनाच्या दिशेने रवाना झाले. या काळात राजकीय नेत्यांच्या हजेºया सुरूच होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यासपीठावर येत आपला पाठिंबा घोषित करीत होते. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर अशा बºयाच नेत्यांचा समावेश होता. आंदोलकांना मार्गदर्शन करण्यासाठी किसान सभेचे केंद्रीय नेते आणि खासदार सीताराम येचुरी यांनी सायंकाळी ४ वा. व्यासपीठाचा ताबा घेतला. सरकारवर आरोपांची सरबत्ती करीत त्यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. अखेर सायंकाळी सव्वा पाच वाजता शेतकºयांचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करून परतले. सर्वच मागण्या मान्य झाल्या नसल्या, तरी अभूतपूर्व विजय मिळविल्याचा दावा शेतकरी नेते कॉ. अशोक ढवळे, कॉ. अजित नवले आणि आमदार जे.पी. गावित यांनी मान्य मागण्यांचे निवेदन वाचून दाखवत आंदोलनाची विजयी सांगता केली.
>...दखल घ्यावीच लागली
गोळीबार होवो किंवा लाठीचार्ज... जीव गेला तरी मुंबई सोडायची नाही! असा
पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. त्यांचा
हा आक्रमक पवित्रा आणि न्याय्य मागण्यांसाठीचा आवाज सर्व देशभर घुमला. त्यामुळेच अखेर सरकारलाही त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावीच लागली.
>पालिकेचा मदतीचा हात
हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात एकटवलेल्या आंदोलकांच्या सुविधेसाठी मुंबई महापालिकेने आझाद मैदानात ६० फिरत्या प्रसाधनगृहांची व्यवस्था केली होती. पिण्याच्या पाण्याचे ४ आणि प्रसाधनगृहांमध्ये वापरण्यासाठी ३ पाण्याचे टँकर आझाद मैदानात सकाळीच दाखल झाले होते. डॉक्टरांसह २ रूग्णवाहिका आणि स्वच्छतेसाठी २० सफाई कामगार मैदानात हजर होते.

Web Title: Kisan Long March: 'Balraj' for the Believers, 80 percent of the demands are approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.