मुंबई - विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च मागे घेण्यात आला आहे. या महामोर्चाने सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आझाद मैदान गाठले. ‘लाल बावटा’ हाती घेतलेले हे वादळ विधानभवनावर आज धडकणार होते. मात्र, सरकार आणि शेतकरी शिष्टमंडळ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत सरकारने शेतक-यांच्या मागण्या मान्य केल्याचे सांगण्यात आले. तसेच, बैठकीनंतर शेतक-यांचे शिष्टमंडळाने आझाद मैदानाकडे जाऊन आंदोलक शेतक-यांसमोर सरकारने दिलेले निवेदन वाचून दाखविले. यावेळी सरकारने शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले असल्याचे सांगितले. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांच्या सहीचे पत्र देण्यात आले असून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत पटलावर सर्व पूर्ण मागण्या मांडणार असल्याची माहिती जे.पी. गावित यांनी सांगितली. यावेळी व्यासपीठावर जे. पी गावित यांच्यासोबत खासदार सीताराम येचुरी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयंत पाटील, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार कपिल पाटील, अशोक ढवळे, अजित नवले, आडाम मास्तर उपस्थित आहेत.
दरम्यान, याआधी सरकार आणि शेतकरी शिष्टमंडळ यांची बैठक संपल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून 80 टक्क्यांहून अधिक मागण्या मान्य आहेत. जीर्ण रेशनकार्ड सहा महिन्यांत बदलून देण्याचे आणि आदिवासींची रेशनकार्ड तीन महिन्यात बदलण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, वनजमिनींच्या मालकीबाबत सहा महिन्यांत निर्णय देण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
शेतक-यांच्या या मोर्चात 30 हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत.
LIVE UPDATES :
5.55 PM - संजय गांधी निराधार योजनेतील मानधन वाढवणार : अशोक ढवळे
5.47 PM - इमूपालन, शेडनेट, शेती सुधारणांसाठीचं कर्ज माफ होणार - अजित नवले
5.46 PM -30 जून 2017 पर्यंतचं कर्ज माफ होणार - अजित नवले
5.45 PM -सातबारा कोरा होईपर्यंत लढा सुरुच राहणार : अजित नवले
5.42 PM -देवस्थान आणि इनामांच्या जमिनी शेतकऱ्यांचे नावे करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल - अशोक ढवळे
5.40 PM - पाण्याचा वापर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच केला जाईल - जे.पी.गावित
5.39 PM - नद्या जोड प्रकल्पात वाहून जाणारे पाणी अडवण्याचा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करू - जे.पी.गावित
5.38 PM - अंमलबजावणीसाठी नव्याने यंत्रणा कार्यान्वित केली जाईल - जे.पी.गावित
5.36 PM - अधिवेशन सुरू असताना लेखी आश्वासन देण्याचा इतिहास आपण घडवलेला आहे, त्यात सर्व प्रलंबित दावे ६ महिन्यांत निपटारा केला जाईल - जे.पी.गावित
5.35 PM - दोनवेळा फसवणूक झाल्याने सरकारकडून खात्रीलायक लेखी घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे बैठकीत मांडले - जे.पी.गावित
5.31 PM - मुख्य सचिवांच्या सहीचे पत्र मिळाले आहे, उद्या मुख्यमंत्री विधानसभेत पटलावर सर्व पूर्ण मागण्या मांडतील- जे.पी.गावित
5.29 PM -पोलिसांनी गाड्यांची व्यवस्था केली होती. मात्र, ती नाकारून मोर्चेकऱ्यांनी पायीच चालणे पसंद केले. हा लाँग मार्च यशस्वीपणे पार केला - जे.पी.गावित
5.27 PM - दहावीच्या परीक्षांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची परीक्षा बुडण्याची भीती होती, पोलिसांनी गाड्यांची व्यवस्था केली होती - जे.पी. गावित
5.25 PM - आझाद मैदानातील व्यासपीठावर जे पी गावित यांच्यासोबत खासदार सीताराम येचुरी, आमदार जयंत पाटील, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार कपिल पाटील, आडाम मास्तर उपस्थित आहेत.
5.20 PM - किसान सभेच्या मागण्यांवर सरकारसोबत चर्चा केल्यानंतर आंदोलनाची पुढील भूमिका जाहीर करण्यासाठी शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ आझाद मैदानात.
5.05 PM - शेतीच्या जमिनी भांडवलदारांना दिल्या जात आहे - सिताराम येचुरी
5. 02 PM - सरकारी बँकांतून ११ लाख कोटी रुपये भांडवलदारांनी थकवले आहेत - सिताराम येचुरी
5.00 PM - देशातील अन्न धान्य उत्पादनाचे प्रमाण घटत असून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परदेशातील धान्याची आयात करण्याचे हे षडयंत्र आहे - सिताराम येचुरी
4.55 PM -लेखी आश्वासनावर विश्वास नाही. मागण्या कधी पूर्ण करणार ती तारीख सांगा - सिताराम येचुरी
4.51 PM - आज प्रण करायचा आहे, यापुढे मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर सरकारला सत्तेवरून खाली खेचावे लागेल - सिताराम येचुरी
4.49 PM - सर्व मागण्यांवर आज शेतकरी लाँग मार्च घेऊन आले आहेत. ८८ वर्षांपासून याचदिवशी महात्मा गांधी यांनी दांडी मार्च काढला होता - सिताराम येचुरी
4.48 PM - आपण नव्या भारताचे सैनिक आहोत. मार्च २०१६ मध्ये शेतकरी आंदोलनाला सुरूवात झाली. चर्चेच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली - सिताराम येचुरी
4.25 PM - किसान सभेचे केंद्रीय नेते खासदार सीताराम येंचुरी आझाद मैदानात दाखल
4.17 PM- वनजमिनींच्या मालकीबाबत सहा महिन्यांत निर्णय - गिरीश महाजन
4.15 PM-- जीर्ण रेशनकार्ड सहा महिन्यांत बदलून देणार, आदिवासींची रेशनकार्ड तीन महिन्यात बदलणार - गिरीश महाजन
4.13 PM- 80 टक्क्यांहून अधिक मागण्या मान्य - गिरीश महाजन
4.12 PM- शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा - गिरीश महाजन
4.10 PM- सरकार आणि शेतकरी शिष्टमंडळामधली बैठक संपली.
2.49 PM- मुंबई: या लढ्यात काँग्रेस पक्ष लाल बावट्याच्या सोबत आहे. : अशोक चव्हाण
02:08 PM- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण थोड्याच वेळात आझाद मैदान येथे जाऊन किसान लाँग मार्च मध्ये सहभागी होणार आहेत.
01:11 PM शेतकरी नेते बैठकीसाठी विधानभवनात दाखल,शिष्टमंडळ-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला सुरुवात. शेतक-यांच्या मागण्यांसंदर्भात बैठकीत चर्चा.
01:05 PM 1 वाजता शेतकरी शिष्टमंडळा सोबत बैठक. सकारात्मक तोडगा निघेल. चंद्रकांत पाटील यांचं विधानपरिषदेत वक्तव्य.
12:56 PM शेतकरी शिष्टमंडळ विधीमंडळामध्ये चर्चेसाठी दाखल.थोड्याच वेळात शिष्टमंडळ- मुख्यमंत्र्यांची चर्चा. 12 जणांच्या शिष्टमंडळासह चर्चा.
12:28 PM किसान मोर्चाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना. विविध मागण्यांवर होणार चर्चा. शिष्टमंडळात अजित नवलेंसह, डॉ अशोक ढवळे आणि किसान सभेच्या नेत्यांचा समावेश.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत सरकार संवदेनशील आहे. त्यामुळे मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. किसान मोर्चावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवदेन दिले. ''महत्त्वाच्या मागण्या घेऊन किसान मोर्चा नाशिकमधून आला. 90 ते 95 टक्के गरीब आदिवासी मोर्चात सहभागी आहेत. सुरुवातीपासूनच सरकार मोर्चेकऱ्यांच्या संपर्कात होते. मात्र ते मोर्चावर ठाम होते.'', असे मुख्यमंत्री म्हणाले. शिस्तबद्ध आणि विद्यार्थ्यांना अडथळा न आणता मोर्चा काढल्याबद्दल त्यांचं कौतुक, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकरांचे आभार मानले.
11:24 AM राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे आझाद मैदानात दाखल.
10:52 AM मुख्यमंत्र्यांची विधिमंडळात बैठक सुरू, किसान मोर्चाच्या मागण्यांवर बैठकीत चर्चा.
10:44 AM सरकार इतके दिवस झोपा काढत होतं का?राधाकृष्ण विखे-पाटील यांची सरकारवर टीका. सोंग घेतलेलं सरकार आता जाग झालंय. सरकारने मागण्यांबद्दल ठोस भूमिका घ्यावी : राधाकृष्ण विखे-पाटील
09:52 AM शेतकऱ्यांचा सरकारला 2 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; अन्यथा विधानभवनावर धडकणार
09:51 AM दुपारी प्रमुख मागण्या मान्य झाल्या नाही, तर शेतकरी विधानभवनाच्या दिशेने कूच करतील, अशोक ढवळे यांचा इशारा.
09:50 AM मुंबई- दुपारी 2 वाजता शेतकऱ्याचं शिष्टमंडळ विधानभवनात भेटीसाठी जाणार. सीताराम येच्युरीही करणार भाषण.
किसान मोर्चाचे नेतृत्व करणारे आमदार जे पी गावित यांच्यासोबत केलेली बातचित
किसान मार्चमध्ये हजारो शेतकरी आझाद मैदानात धडकलेत, मोर्चातील तरूणांशी साधलेला संवाद
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी तयार - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत
- आम्हाला गोळ्या घातल्या तरी पर्वा नाही, मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे न हटण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
शेतक-यांचा मोर्चा मुंबईत दाखल (मोर्चाची क्षणचित्रे स्थळ - लालबाग)
07:16 AM मुंबई - शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला बेचिराख करेल, सामनामधून सरकारवर टीका
07:11 AM मुंबई - आझाद मैदान येथे मोर्चेकरी शेतकऱ्यांची सभा होणार, सभेत किसान सभा आणि कम्युनिस्ट नेते सहभागी होणार
07:07 AM मुंबई - मोर्चेकरी शेतकरी आणि सरकारच्या प्रतिनिधींमध्ये आज दुपारी होणार चर्चा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संताप वाढताच
- मार्च २०१६ मध्ये नाशिक येथे शेतकऱ्यांचा महामुक्काम सत्याग्रह
- मे २०१६चा ठाणे शहरातील हजारो शेतकऱ्यांचा तिरडी मोर्चा
- ऑक्टोबर २०१६ मध्ये पालघर जिल्ह्यातील वाडा येथे शेतकऱ्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांच्या घराला दोन दिवस टाकलेला महाघेराव
- जून २०१७चा ऐतिहासिक शेतकरी संप
- नाशिकमधील महामुक्काम सत्याग्रहापासून ते ऐतिहासित शेतकरी संपापर्यंत स्वत:च्या मागण्या मांडल्या.
शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
- कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा
- कष्टकरी शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती दया
- शेतीमालाला दीडपट भावाची हमी दया
- स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा
- शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा
- दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा
- साखरेच्या भावात हस्तक्षेप करून उसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा
- वनाधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा
- पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी दया
- बोंड आळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी किमान ४० हजार रुपये भरपाई दया
- विकास कामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा
भाजपा वगळता सर्वांचा पाठिंबामोर्चाला भाजपा वगळता सर्वच पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शनिवारी रात्री हा मोर्चा ठाण्यात आल्यावर, शिवसेना नेते एकनाथ शिंदे मोर्चाला सामोरे गेले, तर सेनेचे युवानेते आदित्य ठाकरे विक्रोळी येथे मोर्चात सहभागी झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शेकापचे जयंत पाटील मोर्चात सहभागी आहेत.
सहा मंत्र्यांची समिती केली नियुक्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री अधिका-यांची बैठक घेतली. आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, असे स्पष्ट करण्यात आले. आंदोलकांशी चर्चा करण्यास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची समिती गठीत केली आहे.