Kisan Long March : मुंबईला छावणीचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 05:12 AM2018-03-13T05:12:15+5:302018-03-13T05:12:15+5:30
विविध मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या शेतक-यांच्या मोर्चासाठी रविवारी रात्रीपासूनच मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मुंबई : विविध मागण्यांसाठी मुंबईत धडकलेल्या शेतक-यांच्या मोर्चासाठी रविवारी रात्रीपासूनच मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे मुंबईला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
रविवारी रात्री १२ वाजल्यापासूनच मुंबई पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज झाले होते. सोमैया मैदान येथून २च्या सुमारास शेतकºयांचा मोर्चा निघाला. मोर्चासाठी सायन पुलाच्या खालून कुर्ल्याकडे जाणारी वाहतूक बंद करत, ती चुनाभट्टी फाटकामार्गे वळविण्यात आली होती. त्यामुळे या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवजड वाहनांमुळे काही स्वरूपात वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. पोलिसांनी मोर्चाच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी विशेष बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी होणार असल्याने, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या. त्यात मोर्चाच्या वेळी टिष्ट्वटर, एफ. एम. रेडिओ, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती देण्यात आली.
मध्यरात्रीपासूनच गस्त वाढविण्यात आली होती. शेतकºयांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे लक्ष होते. साध्या गणवेशातील पोलीस शेतकºयांच्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास मोर्चा आझाद मैदानावर धडकला. तेथे हजारोंच्या संख्येने पोलीस तैनात होते. विधानभवनाबाहेरही फौजफाटा वाढविण्यात आला होता. मुंबई पोलीस आणि वाहतूक विभागाच्या योग्य नियोजनामुळे, मोर्चाच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. हा मोर्चा सुरळीत पार पडल्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.