मुंबईः आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून चालत मुंबईत धडकलेल्या किसान लाँग मार्चला राजकीय पक्षांसह नागरिक आणि सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिला आहे. ज्या बळीराजाच्या श्रमांमुळे आपण दोन वेळा सुखाने जेवू शकतो, त्याच्या व्यथा-वेदना अस्वस्थ करणाऱ्याच आहेत. त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करणाऱ्या, त्यांना सलाम करणाऱ्या पोस्ट सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून शेअर केल्यात.
अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवरून 'जय किसान'चा नारा दिला आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शेतकरी १८० किमी चालत आलेत. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना रात्रीही पायपीट करत आझाद मैदान गाठलं. त्यांना खरोखरच सॅल्यूट असं रितेशनं म्हटलंय.
शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यांचं दुःख अस्वस्थ करणारं आहे. अनेक समस्या असतानाही ते संयम ठेवून आहेत. त्यांना न्याय मिळेल, अशी आशा आहे, अशा भावना अभिनेता कुणाल खेमूनं व्यक्त केल्यात.
राजकारण बाजूला ठेवा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा कुठे आहे?, असा सवाल हुमा कुरेशीनं केला आहे.