अक्षय चोरगेमुंबई : राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात शेतक-यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्यामुळे अखिल भारतीय किसान सभेतर्फे ६ मार्चपासून नाशिक ते मुंबई लाँग मार्च सुरू करण्यात आला आहे. रविवारी शेतक-यांचे हे ‘लाल वादळ’ मुंबईत दाखल झाले. मुलुंडपासूनच या मोर्चाचे मुंबईकरांनी स्वागत केले. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, राज्याकर्त्यांनी, संघटनांनी, संस्थांनी, सार्वजनिक मंडळांनी ठिकठिकाणी पाण्याची, अल्पोपहाराची, बिस्किटांची व्यवस्था केली असल्याचे पहायला मिळाले. सहा दिवस अहोरात्र उन्हात चालून देखील शेतकरी प्रचंड उत्साही दिसले. १२ मार्च रोजी आंदोलक विधान भवनाला बेमुदत घेराव घालणार आहेत.
मोर्चाला मदत करणा-या विविध संस्था, संघटना आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही जरी मुंबईसारख्या शहरात राहत असलो, तरी आमचे वडील, काका, अजोबा, मामा गावाकडे शेती करतात. त्यामुळे आम्हाला वाटते शेतक-यांच्या मागण्या शासनाने मान्य करायला हव्यात. मुंबईत मिळाणारा भाजीपाला, धान्य, कडधान्यांपासून ते साखर, तेलापर्यंत सर्व वस्तू शेतक-यांच्या कष्टामुळे आपल्याला मिळतात. त्यामुळे आपण सर्वांनी शेतक-यांच्या या मोर्चाला हातभार लावायला हवा. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकºयांमध्ये बहुतांश शेतकरी हे वयोवृद्ध आहेत. सहा दिवस अहोरात्र, उपाशीपोटी, अर्धपोटी चालत असूनही शेतकरी उत्साही दिसले. बहुसंख्य शेतकरी विविध वाद्ये वाजवताना, वाद्यांच्या तालावर नृत्य करताना पहायला मिळाले. तर अनेकांनी सोबत स्पीकर्स ठेवले होते. काही वेळ शांतपणे मोर्चा पुढे सरकल्यानंतर कोणीतरी मध्येच ‘लाल बावटा... झिंदाबाद’ अशी घोषणा देऊन वातावरण पुन्हा उत्साही करण्याचा प्रयत्न करत आहेत.संपूर्ण कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, पिकांवर खर्चाच्या दिडपट हमीभाव दिला जावा, नदीजोड प्रकल्पांतर्गत ठाणे-पालघर जिल्ह्यांतील गुजरातला जाणारे पाणी नाशिक, पालघर, ठाणे, भागासह मराठवाडा भागाकडे वळवावे, बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना चाळीस हजार रूपये प्रतिहेक्टर नुकसान भरपाई द्यावी, ६० वर्षांवरील अधिक वयाच्या शेतकरी व शेतमजुरांना दोन हजार रूपये पेन्शन सुरू करावी. आणि वन शेतकरी कसत असलेल्या परंतु वनविभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनी शेतकºयांच्या नावे कराव्या अशा मागण्या मांडण्यासाठी शेतकरी गेले सहा दिवस अहोरात्र मुंबईच्या दिशेने चालत आहेत. कहाळी नृत्यप्रदर्शनमोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी त्यांच्यासोबत संबळ, पिपाणी, ढोलकी, बासरी आणली होती. या वाद्यांच्या तालावर शेतकरी ‘कहाळी’ या आदिवासी नृत्यप्रकारावर आधारीत नृत्याचं सादरीकरण करून सोबत आलेल्या इतर शेतकरी आणि सहकाºयांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करत होते. तसेच आंदोलक स्त्रिया विविध प्रकारची पारंपारीक गाणी म्हणत होत्या. पायात घुंगरू बांधून आलो आहे..शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, दुधाला चांगली किंमती द्यावी अशा आमच्या मागण्या आहेत. सरकारला जागे करण्यासाठी आलो आहोत. सोबत आलेल्या शेतकºयांना उत्साही ठेवण्यासाठी नाशिकपासून पायात घुंगरू बांधून आलो आहे. या आवाजाने मी व माझे मित्र अधून मधून नाचत असतो. सहा दिवस झाले चालत आहोत, अद्याप कंटाळा नाही आला. घुंगरांचा आवाज सरकारच्या कानावर जाईल, असे वाटते. काल रात्री आमच्या पैकी अनेकांना जेवन मिळाले नाही. तरी सर्वजन उत्साही आहेत.शिवराम चौधरी, कारंजुल, सूरदाना, नाशिकशासनाने निराधार योजना राबवावी, वयोवृद्ध शेतकºयांसाठी पेन्शन योजना सुरू करावी, रेशनिंगवर किमान ५ लीटर रॉकेल द्यावे, कसत असलेल्या वनजमिनी आमच्या ताब्यात द्याव्यात अशा मागण्या घेऊन नाशिकहून आलो आहे. सोमवारी या मागण्या सरकार दरबारी मांडू. हरी गायकवाड, अलंगूण, सुरगाना, नाशिकमाझी ५ एकर जमीन वनविभाकडे आहे. त्या जमिनीचा सात-बारा माझ्या नावे व्हायला हवा. मी २८ वर्षे झाली ती जमीन कसत आहे. माझी विहिर आटली आहे, त्यामुळे गेल्या चार वर्षात जमीन कसू शकले नाही. भाड्याने पाणी घेऊन पोटासाठी थोडीफार जमीन कसत आहे, परंतु गेल्या दोन वर्षात पीक -पाणी चांगले नसल्यामुळे मी कर्जबाजारी झाले आहे. पाणी आणि जमिनीविणा मी विधवा स्त्री काय करणार? सरकारने आम्हाला आमच्या जमिनी द्याव्यात. निराधारांसाठी योजना राबवावी. सुमन विधाटे, म्हैसगाव, रावरी, अहमदनगरमी व माझे तीन भाऊ मिळून २० एकर जमीन कसतो. परंतु ती जमीन वनविभाग आमच्या ताब्यात देत नाही. गेल्या चार वर्षांपासून माझ्या विहिरीला पाणी नाही, पाऊसदेखील चांगला पडला नसल्यामुळे कर्जबाजारी झालो. जमीन नाही, पाणी नाही, पीक नाही अशा परिस्थितीत आम्ही आमचा उदनिर्वाह कसा करायचा? सहा दिवस या मोर्चात चालत आहे. कालपासून उपाशी आहे. सरकारला याच्याशी काही देणेघेणे नसल्याने आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सुखदेव शेंडगे, खांबगाव, संगमनेर, अहमदनगर मोबाईल चार्जिंगसाठी जुगाड!मोर्चात सहभागी झालेले आंदोलक सहा दिवस अहोरात्र चालत आहेत. दरम्यान त्यांना मोबाईल चार्ज करण्यासाठी कोठेही वीज उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी लक्ष्मण भसरे यांनी ‘सोलार पॅनेल’ सोबत आणले होते. हे पॅनेल डोकयात अडकवून दिवसभर सहकाºयांचे मोबाईल, टॉर्च चार्ज करू देत असल्याचे पहायला मिळाले. भसरे यांनी सांगितले की, अजूनही तीन-चार शेतकºयांनी असा ‘जुगाड’ केला आहे. तसेच पॅनेल डोक्यात अडकवल्याने उन्हाचा त्रास होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. पंजाबी आणि ख्रिस्ती बांधवांचाही पाठिंबासंत बाबा ठाकरसिंगजी कास सेवा विक्रोळी (विक्रोळी गुरूद्वारा) तर्फे आंदोलकांसाठी नाश्ता, पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मंडळाने सांगितले की, आमचेही नातेवाईक पंजाबमध्ये शेती करतात. त्यामुळे आम्हाला शेतकºयांच्या प्रश्नांची जान आहे. सहा दिवस उन्हातान्हात चालत आलेल्या शेतकºयांचे स्वागत आणि त्यांची व्यवस्था करणे आमचे कर्तव्य आहे. तसेच दी बॉम्बे कॅथलिस सभेतर्फे विक्रोळी येथे आंदोलकांसाठी पाणी आणि बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली होती. शेतकºयांच्या अडचणींच्या काळात मुंबईकर त्यांच्यासोबत असल्याचे कॅथलिक सभेतर्फे सांगण्यात आले.