मनोज गडनीस,मुंबई : कोव्हीड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, या चौकशीला त्या गैरहजर राहिल्या. आपल्या वकिलामार्फत त्यांनी ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ मागितली आहे. मात्र, त्यांच्या मुदतवाढीसंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची सहा तास चौकशी केली होती.
कोव्हीड काळामध्ये खरेदी झालेल्या बॉडी बॅग्स या एका खाजगी कंपनीकडून मुंबई महानगरपालिकेने तिप्पट दराने खरेदी केल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.