“BMC मध्ये शिवसेनेची सत्ता येणारच, मुंबईकर आमच्यासोबत”; किशोरी पेडणेकरांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 03:22 PM2022-03-07T15:22:47+5:302022-03-07T15:24:30+5:30
मुंबईत शिवसेनेची सत्ता आल्यास महापौर तुम्हीच होणार का? किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टच सांगितले.
मुंबई: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र, निवडणुका जाहीर न झाल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. आता निवडणुका लागेपर्यंत मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासक पाहणार आहेत. जोपर्यंत महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत प्रशासकच मुंबई महापालिकेचा गाडा हाकणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचीच सत्ता येणार असून, मुंबईकर आमच्यासोबत असल्याचे विश्वास व्यक्त केला आहे.
किशोरी पेडणेकर यांनी मीडियाशी बोलताना, आमचा कार्यकाळ संपला असल्याने आता माझी नवी इनिंग सुरू होत असल्याचे म्हटले आहे. मी काळजीवाहू महापौर म्हणून काम करणार आहे. मी मुंबईला असेच सोडणार नाही. मी काम करणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. महापौर किशोरी पेडणेकर या काळजीवाहू महापौर असणार आहेत.
मुंबईत शिवसेनेची सत्ता आल्यास महापौर तुम्हीच होणार का?
ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काम करत आहेत. त्यामुळे किमान मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता येणारच, असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. मुंबईत शिवसेनेची सत्ता आल्यास महापौर तुम्हीच होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, महापौर शिवसेनेचाच होईल. ती मी असेल किंवा दुसरे कोणी हे पक्ष प्रमुख ठरवणार, असे पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
पक्ष बांधणीसाठी वेळ देणार
माझी नवी इनिंग सुरू होत आहे. आता पुन्हा जोमाने काम करू. पक्ष बांधणीसाठी वेळ देणार आहे. मी परिचारिका होते. परिचारिकेची आवड असल्यानेच मी काम करू शकले. मग कोरोना काळात स्थिती हाताळण्याची संधी मिळाली. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मोठी संधी दिली. त्यामुळे मी काम करू शकले. त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
कोरोना रोखण्यात मुंबई यशस्वी ठरली
मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. शिवसेनेचाच महापौर बसेल. कोरोना काळात मुंबईने चांगलं काम केलं. कोरोना रोखण्यात मुंबई यशस्वी ठरली. देशात अव्वल ठरली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आव्हानांना संधी मानून काम केले. तसेच तसेच पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, असे नमूद करत कोरोना काळात दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मुंबईकरांचे आभार मानले.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनीच माझ्यावर वैयक्तिक टीका केली. श्रीकृष्णाने द्रौपदीला मदत केली होती. तुम्ही त्रास देत आहात, अशी टीकाही त्यांनी केली. नारायण राणे यांनी केलेल्या गंभीर आरोपाला प्रत्युत्तर देताना, मुख्यमंत्री फोन करणार नाहीत. राणे खोटे बोलत आहेत. फोन केला असेल तर पुरावा दाखवा, असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी यावेळी बोलताना दिले.