BMC Election 2022: मुंबईसह अनेक महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. मात्र, मुंबई, ठाणे महानगरपालिकांच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेला चांगलीच आव्हानात्मक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. गत निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी भाजप उत्सुक असल्याने शिंदे गट आणि भाजप शिवसेनेला चितपट करण्यासाठी रणनीति आखत असल्याचे बोलले जात आहे. यातच आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचेच वर्चस्व कायम राहील. इतकेच नाही, तर शिवसेना १५० जागांवर बाजी मारेल, असा दावा करण्यात आला आहे.
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी याबाबत दावा केला आहे. गेल्या २५ वर्षापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, हेच मोडीत काढण्यासाठी आता भाजपकडून सर्वतोपरी तयारी केली जात आहे. आगामी दोन दिवस गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल होत आहेत. असे असले तरी महापालिकेवर भगवाच कायम राहणार. यंदाच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ होऊन हा आकडा १५० असेल, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
मनसेला कोणती विचारधाराच राहिलेली नाही
राज ठाकरे उद्या कोणाच्याही व्यासपीठावर दिसतील. याबाबत नवखे असे काही राहणार नाही. ते फक्त शिवसेना आणि उद्धव ठाकरे आहेत, त्या व्यासपीठावर येणार नाहीत. यामुळे पक्षाला कोणती विचारधाराच राहिलेली नाही हेच स्पष्ट होते, असा आरोपही किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. तसेच नेत्यांमध्ये बदल होतील पण शिवसैनिकांमध्ये नाही असे म्हणत त्यांनी मुंबई महापालिका शिवसेनेचीच असल्याचा ठाम विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. त्या टीव्ही९शी बोलत होत्या.
दरम्यान, काही झाले तरी शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच दसरा मेळावा होणार असल्याचा पुनरुच्चार किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. तसेच गुढी पाडवा मेळाव्यासह अनेकांचे मेळावे शिवतीर्थावर होत असतात. मात्र, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेत होते. त्यांच्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच तिथे दसरा मेळावा घेणार, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.