मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आतापासूनच पक्षांनी तयारीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिवसैनिकांना आता निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश अलीकडेच दिल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची सूत्रे आदित्य ठाकरेंकडे (Aaditya Thackeray) असल्याचेही बोलले जात आहे. यावरून महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण करत, आदित्य ठाकरे शिवसेनेच्या भल्याचाच निर्णय घेतील, असे म्हटले आहे.
ज्या शिवसेनेत मी वाढलेय, त्या पक्षात निवडणुकीचं तिकीट देताना कोणाचीही जात, धर्म किंवा वय बघितले जात नाही. फक्त ती व्यक्ती चांगलं काम करणारी हवी. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार, ही केवळ अफवा आहे. ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मनात पक्षाविषयी रोष उत्पन्न करुन आदित्य ठाकरे यांचे सामर्थ्य खच्ची करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात आहेत, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्या मीडियाशी बोलत होत्या.
शाखाप्रमुख आणि आणि नगरसेवक ही आदित्य ठाकरे यांची शस्त्र
बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, वयाचे काय घेऊन बसलात, तुम्ही मनाने तरुण राहिले पाहिजे. मुंबईत शिवसेनेचे मनाने 'तरुण' असलेले नगरसेवक उत्तमरित्या काम करत आहेत. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. वयाच्या चाळीशी-पंचेचाळीशीत असलेले शाखाप्रमुख आणि आणि नगरसेवक ही आदित्य ठाकरे यांची शस्त्र आहेत. त्यामुळे ज्येष्ठांना डावलणार अशी आवई उठवून या लोकांच्या मनात शिवसेनेविषयी राग निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरुन आदित्य ठाकरे यांच्या शस्त्रांची धार बोथट होईल, असा दावा पेडणेकर यांनी केला.
ते जे निर्णय घेतील, ते पक्षाच्या हिताचेच असतील
शिवसैनिकांना आपल्याला पक्षाने कुठून कुठपर्यंत नेऊन ठेवले, याची जाणीव आहे. त्यामुळे पक्ष घेईल तो निर्णय सगळयांना मान्य असतो. निवडणुकीत हेवेदावे होतात, मांडीला मांडी लावून बसणारे विरोधात जातात, पण हे सर्व तात्पुरते असते. जो चांगलं काम करत असेल त्यालाच पक्ष तिकीट देतो. त्यामुळे तिकीट वाटपाच्या १५ दिवसांत सर्व परिस्थिती कशी हाताळायची, हे एक टेक्निक असतं. ते आम्ही इतरांसमोर उघड का करावं? आम्ही यावेळची निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली लढणार आहोत. ते जे निर्णय घेतील, ते पक्षाच्या हिताचेच असतील, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने तरुण उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नगरसेवकांऐवजी शिवसेना यंदाच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे सांगितले जात होते.