२५ वर्ष सत्तेची बोरं चाखलेले आता शड्डू ठोकतायत, किशोरी पेडणेकरांचा निशाणा
By मोरेश्वर येरम | Published: November 19, 2020 04:26 PM2020-11-19T16:26:22+5:302020-11-19T16:35:14+5:30
राजाचा जीव जर पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय? असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केलाय.
मुंबई
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या 'मिशन मुंबई' बैठकीनंतर राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केलाय. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सडकून टीका केलीय.
'ज्यांनी गेली २५ वर्ष मुंबई महापालिकेत आमच्यासोबत बोरं चाखली तोच पक्ष आमच्यासमोर शड्डू ठोकत असेल तर आम्ही आव्हान स्वीकारले असे समजा', असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. राजाचा जीव जर पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय? असा सवाल उपस्थित करत किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचाही समाचार घेतला.
भाजपच्या मुंबईतील बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर स्वबळावर झेंड फडकवणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी 'राजाचा जीव ज्याप्रमाण पोपटात असतो, तसा काहींचा जीव मुंबई महापालिकेत अडकला आहे, असं नाव न घेता शिवसेनेवर टीका केली होती. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या अतुल भातखळकर यांना भाजपने प्रभारी म्हणून जाहीर केलं आहे. यावरही किशोरी पेडणेकर यांनी हल्लाबोल केला.
'अतुल भातखळकर यांच्यावर मुंबईची जबाबदारी असेल तर मग आशिष शेलार काय करणार? शेलारांच्या नेतृत्वात मागची निवडणूक लढली गेली होती. त्यांच्या अभ्यास चांगला आहे, मग नेतृत्व बदल का? भाजपमध्ये अंतर्गत वाद तर नाही ना?', असा खोचक टोला पेडणेकर यांनी भाजपला लगावला आहे.