Join us

चांगली महापौर म्हणून टार्गेट होत असेल तर...; ईडी चौकशीवर किशोरी पेडणेकर संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 1:15 PM

मी नियतीला मानते, जे काही आपण कर्म करतो त्याचा हिशोब द्यायला लागतो असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

मुंबई - ईडीचे पहिले पत्र हाताने लिहिले होते, आता दुसरे पत्र पाठवलंय ते संगणकावरील आहे. ईडीने चौकशीत जी काही कागदपत्रे मागवली ती मी दिलेली आहेत. पुन्हा मागितली तरी द्यायची तयारी आहे. ज्या प्रकारे आरोप होतोय तो मी कधीही मान्य करणार नाही. मी महापौर म्हणून काम केले, पण माझ्यासोबत अनेकजण होते, त्यात स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती, सभागृह नेता, विरोधी पक्षनेते असतात. महापौर म्हणून मी चांगले काम केले म्हणून टार्गेट होत असेल तर जे काही असेल त्याला सामोरे जायला तयार आहे अशी संतप्त भूमिका माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली. 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, चौकशीत सत्य बाहेर येईल. मी कधीही कुणावरही दबाव टाकला नाही. दबाव टाकून आयुक्त काम करत असतील तर आता नगरसेवकच नाही मग दबावावरच काम करतायेत का?, आयएएस अधिकारी म्हणून तुम्ही काम करताय. ज्यांच्यावर आरोप झाले ते गेले. मी नियतीला मानते, जे काही आपण कर्म करतो त्याचा हिशोब द्यायला लागतो. महाराष्ट्रातच नव्हे देशातच उलथापालथ सुरू आहे. सत्तेतले आणि विरोधातले सर्व संविधानावर चाललेत. बाबासाहेबांनी संविधानात दिलेल्या अधिकारामुळे आम्ही काम करतोय. संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही उत्तर देऊ. तपास यंत्रणांना आम्ही सहकार्य करू. यंत्रणाच्या कुणाच्या इशाऱ्यावर चाललीय हे सगळ्यांना माहिती आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच महापौरांना प्रशासकीय काय अधिकार आहेत, आयुक्तांवर एकाच कामावर दबाव कसा येईल, मग आताही दबावापोटी आयुक्त काम करतायेत का याचेही उत्तर द्यावे लागेल. महापालिका रस्ते घोटाळ्यावर आदित्य ठाकरेंनी आवाज उचलल्यावर कंत्राट रद्द झाले. ठेकेदारांवर कारवाई होतेय. संविधानातील एक नागरीक म्हणून जे मी केले नाही त्याला सामोरे जाणार आहे. मी काहीही केले नाही. सत्यमेव जयते असं म्हणत पेडणेकरांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. 

काय आहे प्रकरण?

कोविड काळामध्ये खरेदी झालेल्या बॉडी बॅग्स या एका खाजगी कंपनीकडून मुंबई महानगरपालिकेने तिप्पट दराने खरेदी केल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यातून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली जात आहे.  

टॅग्स :किशोरी पेडणेकरअंमलबजावणी संचालनालयमुंबई महानगरपालिका