किसमें कितना है दम...; अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 12:27 PM2023-03-26T12:27:59+5:302023-03-26T12:30:02+5:30

गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी म्हणजे, कार्यकारी मंडळावर असलेले सदस्य आणि विरोधातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या बऱ्याच फैरी झडल्या.

Kismen Kitna Hai Dum...; All India Marathi Theater Council election battle | किसमें कितना है दम...; अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी

किसमें कितना है दम...; अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी

googlenewsNext

- संजय घावरे

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ‘रंगकर्मी नाटक समूह’ आणि ‘आपलं पॅनल’ आमनेसामने उभे ठाकले आहेत. राज्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ८० रंगकर्मींपैकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी म्हणजे, कार्यकारी मंडळावर असलेले सदस्य आणि विरोधातील सदस्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या बऱ्याच फैरी झडल्या. दोन कार्यकारिणी, दोन अध्यक्ष असे काहीसे रूप अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेला पाहायला मिळाले. आता झाले गेले विसरून जाऊन उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून आगामी निवडणुकीकडे तमाम रंगकर्मी पाहत आहेत. १६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, मुंबई आणि उपनगरातून प्रत्येकी १४, तर महाराष्ट्रातून ८० उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. दोन्ही पॅनल आपापली बाजू मांडत असून, आपण केलेल्या कार्यावर मते मागत आहेत. 

काहींनी निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांच्याकडे चिन्हाचीही मागणी केली, परंतु चिन्हे देण्याची तरतूद नाट्यपरिषदेच्या घटनेत नसल्याने नवीन प्रथा सुरू करून भविष्यात चिन्हांवरून वांदग निर्माण करण्याचा विचार नसल्याचे दळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘रंगकर्मी नाटक समूहा’चे दिलीप जाधव म्हणाले की, नाट्यपरिषदेवर आता बदल होण्याची गरज आहे. सध्याच्या कार्यकारिणी अपेक्षेनुसार कार्य न केल्याने नवीन सदस्यांना संधी मिळण्याची गरज आहे. भविष्यात निवडणूक लढविणार नसल्याचे सांगून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्यांचा रंगकर्मींनी विचार करायला हवा, असेही जाधव म्हणाले.

कोणताही अनुचित प्रकार न होता, ही निवडणूक होईल हे पाहायचे आहे. यासाठी मी तटस्थपणे काम करत आहे. मला मिळालेली भूमिका चोख बजावायची आहे. यासाठी कोणाचेही, कोणत्याही शंकेचे निरसन दोन दिवसांमध्ये करत आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता ही निवडणूक घेतली जाईल. या पदावर काम करताना माझ्या वैयक्तिक मतांना काहीच अर्थ नाही.
- गुरुनाथ दळवी, प्रमुख निवडणूक अधिकारी

कोरोनासारखी पुन्हा परिस्थिती उद्भवल्यास परिषदेला स्वबळावर रंगकर्मींना मदत करता यायला हवी. रंगकर्मी कामगारांसाठी योजना राबवायच्या आहेत. नाट्यगृहांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अध्यक्ष कोण होणार, हे निवडून आलेले ६० जण ठरवतील. संधी मिळाल्यास उत्तम आणि जोमाने काम करणार यात शंका नाही. वाद-विवाद न करता शांततेने काम करायचे आहे.
- प्रशांत दामले, अभिनेते, निर्माते.

नाट्यपरिषद स्वयंपूर्ण बनविण्यासोबतच इतरही बरीच कामे केली आहेत. महाराष्ट्रातील ९२ नाट्यगृहांसाठी देखभाल आणि दुरुस्ती निधीसाठी पाठपुरावा करून, ५० कोटींची तरतूद सरकारी बजेटमध्ये केली आहे. पुढील पाच वर्षांमध्ये नाट्यपरिषद सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न असेल. वार्षिक सर्वसाधारण सभेत हिशेब मान्य झाल्याने आता कोणाचा विरोध नाही.
- प्रसाद कांबळी, निर्माता.

Web Title: Kismen Kitna Hai Dum...; All India Marathi Theater Council election battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.