एकतर्फी प्रेमातून स्थानकावर चुंबन; तर लिफ्टमध्ये ‘प्रपोज’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 03:16 AM2019-03-27T03:16:25+5:302019-03-27T03:20:23+5:30
एकतर्फी प्रेमातून पाठलाग करत एकाने स्थानकावरच तरुणीचे चुंबन घेतले, तर दुसऱ्या घटनेत तरुणाने लिफ्टमध्ये अडवून मुलीला प्रपोज करत, आय लव्ह यू बोलण्यासाठी आग्रह धरला. कांजूर आणि वरळी परिसरात रविवारी हे प्रकार उघडकीस आले.
मुंबई : एकतर्फी प्रेमातून पाठलाग करत एकाने स्थानकावरच तरुणीचे चुंबन घेतले, तर दुसऱ्या घटनेत तरुणाने लिफ्टमध्ये अडवून मुलीला प्रपोज करत, आय लव्ह यू बोलण्यासाठी आग्रह धरला. कांजूर आणि वरळी परिसरात रविवारी हे प्रकार उघडकीस आले. त्यानुसार, दोन्ही रोमिओंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करत, पोलिसांनी त्यांची रवानगी कोठडीत केली आहे.
पवई परिसरात राहणारी १९ वर्षीय नेहा (नावात बदल) रविवारी रात्री १०च्या सुमारास घरी जाण्यासाठी कांजूर स्थानकात उतरली. दरम्यान वसीम मोहम्मद खालीद शेख (२५) याने तिचा पाठलाग सुरू केला. कोणीतरी आपला पाठलाग करत आहे हे नेहाच्या लक्षात येताच ती घाबरून फलाटावरील खुर्चीवर बसली. शेख स्थानकातून बाहेर जाईल याची ती वाट बघत होती. मात्र शेखने तेथे येत तिचा हात धरला. तिने हात झटकून देताच त्याने फलाटावरूनच तिला खेचत स्थानकाबाहेर आणले. तू मला खूप आवडते, असे म्हणत जबरदस्तीने तिचे चुंबन घेतले.
तिने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करत घर गाठले. दुसऱ्या दिवशी पार्कसाईट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत, शेखला अटक केली.
दुस-या घटनेत वरळी पोलिसांनी पॉक्सो आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात सचिन वाल्मिकी (२५) या तरुणाला अटक केली आहे. तो प्रेमनगर परिसरात राहतो. येथीलच १७ वर्षीय रेश्मावर (नावात बदल) त्याचे एकतर्फी प्रेम होते. वरळीतील एका १४ मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर रेश्माचे वडील काम करतात. रेश्माचीही त्यानिमित्ताने या इमारतीत ये-जा असायची. २२ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास तिने वडिलांकडे जाण्यासाठी इमारतीत प्रवेश केला. लिफ्टने ती सातव्या मजल्यावर जाणार तोच, वाल्मिकी लिफ्टमध्ये शिरला.
त्याने लिफ्ट १४ व्या मजल्यावर नेली. तेथे लिफ्ट थांबताच, भीतीने नेहा पायऱ्यांवरून खाली उतरू लागली. त्या वेळी वाल्मिकीने तिचा हात धरत प्रपोज केले. तिच्याकडे आय लव्ह यू म्हणण्यासाठी हट्ट धरला. मात्र त्याला धक्का देत ती धावतच वडिलांकडे गेली. सुरुवातीला घाबरून तिने याबाबत कुणाकडे वाच्यता केली नाही. मात्र वाल्मिकी पुन्हा पाठलाग करू लागल्याने तिने रविवारी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पॉक्सो, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी वाल्मिकीला अटक केली. वाल्मिकी घरकाम करतो.