Join us

किस्सा खुर्ची का- ५० रुपये घेतले, बीडला गेले अन् खासदार झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:40 AM

एका स्वातंत्र्यसैनिकाने माझा पराभव केला, पराभवाचे मला दु:ख नाही, अशी प्रतिक्रिया नाना पाटलांनी दिली होती.

यदु जोशी

क्रांतिसिंह नाना पाटील हे ब्रिटिश राजवटीत स्थापन झालेल्या प्रतिसरकारचे निर्माते. जाज्वल्य राष्ट्राभिमानी, लढवय्ये नेते, अशी त्यांची प्रतिमा होती आणि समाजात त्यांच्याप्रती प्रचंड आदरभाव होता. इंग्रजांच्या राजवटीतही स्वत:ची प्रशासन व्यवस्था असलेले प्रतिसरकार त्यांनी सातारा जिल्ह्यात (त्यावेळी सांगलीही सातारमध्येच होते) चालविले. स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकारण केले. १९५७ च्या निवडणुकीत ते सातारा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. १९६२ च्या निवडणुकीत स्वातंत्र्यसैनिक किसनवीर यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हा, एका स्वातंत्र्यसैनिकाने माझा पराभव केला, पराभवाचे मला दु:ख नाही, अशी प्रतिक्रिया नाना पाटलांनी दिली होती.

१९६७ ची लोकसभानिवडणूक आली. कम्युनिस्ट पक्षाचे दोन कार्यकर्ते साताऱ्याला कॉम्रेड नारायणराव माने यांच्या घरी गेले, तिथेच क्रांतिसिंह बसलेले होते. ‘पक्षाने तुम्हाला बीड मतदारसंघातून लढण्यास सांगितले आहे, उद्या तिथे पोहोचा, असा निरोप त्यांनी क्रांतिसिंहांना दिला. सातारच्या नेत्याला बीडमधून लढण्यास सांगितले गेले. मनात चलबिचल सुरू झाली, आपल्याकडे तर बीडला जायलाही पैसे नाहीत, शिवाय अर्जही भरायचा आहे, आता कसे करायचे अशी चिंता सतावू लागली. दिवे लागणीच्या वेळेला काँग्रेसी असलेले धुमाळ गुरुजी मानेंच्या घरी आले, त्यांनी क्रांतिसिंहांच्या हाती ५० रुपये दिले आणि बीडची तयारी करा म्हणाले. बीड जिल्हावासीयांना ते अपरिचित नव्हतेच. हैदराबाद मुक्ती संग्रामातील अमूल्य योगदानामुळे त्या भागातही त्यांच्याविषयी मोठी आत्मीयता होती. काँग्रेसचे द्वारकादासजी मंत्री यांचा त्यांनी पराभव केला. आज बाहेरच्या जिल्ह्यातल्या कोणाला उमेदवारी दिली तर हे पार्सल परत पाठवा, असा जोरदार प्रचार केला जातो; पण बीडवासीयांनी क्रांतिसिंहांना खासदार म्हणून स्वीकारले. ‘कोण आला रे कोण आला, सातारचा वाघ आला’, अशा घोषणांनी त्यांचे स्वागत होत असे. जिल्ह्याच्या वगैरे सीमा त्यांनी आपल्या कर्तृत्वाने कधीच ओलांडल्या होत्या. 

खासदार असतानाही ते एसटीने फिरत. सरकारी सवलती घेत नसत. दिल्लीतील त्यांच्या सरकारी निवासस्थानी सामान्य माणसे, कार्यकर्ते यांचा राबता असे. एकदा ते रेल्वेने दिल्लीला गेले, रेल्वेस्थानकावर त्यांना एक शीख कुटुंब दिसले, त्या कुटुंबाला दिल्लीत राहायला जागा नव्हती, ते त्यांना आपल्या घरी राहायला घेऊन गेले, ते कुटुंब मग तिथेच राहिले. १९५२ मध्येच त्यांनी लोकसभानिवडणूक लढावी, असा आग्रह करण्यात आला होता पण नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले होते, खासदार न होताच समाजासाठी खूप काही करण्यासारखे बाकी आहे असे म्हणत क्रांतिसिंहांनी त्यास विनम्रपणे नकार दिला. १९५७ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले तेव्हा त्यांनी मराठीतून भाषण दिले. कोणत्याही प्रादेशिक भाषेतून लोकसभेत दिलेले ते पहिले भाषण ठरले. पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्या भाषणाचे कौतुक केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. सामान्य माणसांशी हयातभर नाळ जुळलेला हा लोकनेता गावोगावी जाई तेव्हा देवळात, पारावर लोकांशी रात्री उशिरापर्यंत संवाद साधत तिथेच झोपत असे.

टॅग्स :लोकसभालोकसभा निवडणूक २०२४निवडणूकबीडसातारा परिसर