मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दराने किराणा वस्तूही महागल्या असून भाजीपालाही महागल्याने अनेकांनी आपला मोर्चा कडधान्य तसेच डाळींकडे वळवला आहे. राज्यात विविध राजकीय पक्षांतर्फे पेट्रोल, डिझेल तसेच वाढलेल्या गॅसच्या किमती कमी करण्यासाठी आंदोलने, निषेध मोर्चे काढण्यात येत आहेत. मात्र तरीही सरकारने अद्याप दखल घेतली नसून गॅसचे दर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ८३४ रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणींची संसार करताना तारेवरची कसरत होत असून पैैसा आणायचा कोठून, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
डाळही महागली
मध्यंतरी तेलाने भडका घेतला असता स्वयंपाकात कमीत कमी तेलाचा वापर करून गृहिणी कुटुंबाच्या जेवणाची सोय करीत होत्या; मात्र भाजीपाला महागल्याने किमान ताटातून भाजीपाला गायब होऊन फोडणीच्या वरणावर भागविता येत होते. आता तुरीची डाळच ९० ते ११० रुपये किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे फोडणीच्या वरणावरही विरजण पडले असून ताटातून भाजीपाल्यासोबतच आता वरणही गायब होत आहे.
भाजीपाला व किराणाचे बजेट तेवढेच
पूर्वी किराणा भरताना महागाई बघून थोडेथोडे करून कसे तरी चालविले जात होते. मात्र आता भाजीपालाही भडकला असून किराणा व भाजीपाला दोघांचेही बजेट समान झाले आहे. त्यामुळे स्वयंपाकघराचे संपूर्ण बजेट कोलमडले असून दोन वेळच्या जेवणात काय करावे हाच प्रश्न पडतो.
- नम्रता सोनवणे (गृहिणी)
सर्वसामान्यांचा घासही हिरावतोय
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वच वस्तूंचे दर वधारले आहेत; मात्र भाजीपाला व किराणा सामानावर त्याचा फटका बसत असल्याने सर्वसामान्यांनी काय खावे, असा प्रश्न पडत आहे. भाजीपाला एवढा महागला की काय खरेदी करावे हेच समजत नाही. त्यात किराणा महागल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. महागाईने सर्वसामान्यांच्या तोंडचा घास हिसकावला आहे.
- रूपाली वाघमारे(गृहिणी)
नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा येथून भाजीपाला येतो व आम्ही येथून खरेदी करून विकतो. आता पेट्रोल-डिझेलचे दर वधारल्याने भाजीपालाही महागला आहे. परिणामी आम्हालाही आमचा नफा काढून भाजीपाला विकावा लागतो. महागलेल्या भाजीपाल्यामुळे आता नागरिक मोजकाच भाजीपाला घेत असून यात आमचेही नुकसान होत आहे.
- राजू शिंदे (भाजी विक्रेता)
पूर्वी ग्राहक किराणाची महिनाभराची संपूर्ण यादीच आणून देत होते. आता मात्र महागाई वाढल्याने ग्राहक मोजकाच व आवश्यक तेवढाच किराणा खरेदी करीत असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे मागील वर्षीपासून व्यापार थंडावला आहे. त्यात आता आणखी महागाई वाढल्यामुळे व्यापारीही अडचणीतच आहेत.
- अभय काळे (किराणा व्यापारी)
भाजीपाल्याचे दर
शेवगा- ६०
गवार शेंग- ८०
मेथी- ३०
पालक - ३०