Join us

पतंग उडविणे जिवावर बेतले

By admin | Published: October 31, 2015 1:48 AM

ठाणे-मुंबई हायवेवरील सर्व्हिस रोडवर पतंग उडवीत असताना कारच्या धडकेत १३वर्षीय कृष्णा गुंदन यादव गंभीर जखमी झाला होता

मुंबई : ठाणे-मुंबई हायवेवरील सर्व्हिस रोडवर पतंग उडवीत असताना कारच्या धडकेत १३वर्षीय कृष्णा गुंदन यादव गंभीर जखमी झाला होता. सायन रुग्णालयात गेले तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या यादवचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. भांडुप पूर्वेकडील टाटानगर परिसरात कृष्णा कुटुंबीयांसोबत राहत होता. मंगळवारी सायंकाळी ६च्या सुमारास कृष्णा मित्रांसोबत ठाणे-मुंबई हायवेवरील सर्व्हिस रोडवर पतंग उडवित होता. तेव्हा मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने त्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. यादवची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सायन रुग्णालयात हलविण्यात आले. गुरुवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कृष्णाच्या मृत्यूने यादव कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालक अद्यापही फरार आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी यादव कुटुंबीयांकडून होत आहे. (प्रतिनिधी)