पतंगरावांच्या आठवणींना उजाळा, विखे पाटील झाले भावुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 06:31 AM2018-03-13T06:31:00+5:302018-03-13T06:31:00+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने एक अजातशत्रू, दिलदार, अभ्यासू, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट संसदपटू, कार्यक्षम लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त करीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने एक अजातशत्रू, दिलदार, अभ्यासू, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट संसदपटू, कार्यक्षम लोकप्रतिनिधी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त करीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावावर बोलताना अनेक सदस्य भावुक झाले. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी पतंगरावांच्या अंत्यदर्शनासाठी गेलो तेव्हा काही व्यक्तींच्या हाती फलक होते. ‘देवाने आमचा देव चोरून नेला’, असे हृदयाला भिडणारे वाक्य त्यावर लिहिलेले होते हे सांगताना विखे पाटील अश्रू आवरू शकले नाहीत. आपल्यासाठी ते पितृतुल्य होते, असे ते म्हणाले.
ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून शुन्यातून आयुष्य घडवले असे स्व. गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, विलासराव देशमुख, डॉ. पतंगराव कदम, वसंत डावखरे असे महाराष्ट्राचे सामान्यातील नेतृत्व हरपणे म्हणजेच राज्यात पोकळी निर्माण झाल्याची भावना मुख्यमंत्री यांनी व्यक्त केली. विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे म्हणाले की शून्यातून विश्व निर्माण करणाºया पतंगरावांचा एक शिक्षक ते विद्यापीठाचा कुलपती हा प्रवास विस्मयजनक होता. मंत्री म्हणून त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले.
पतंगरांवाना झालेल्या कर्करोगाचा उल्लेख करीत आपली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, भाजीपाला तसचे पिकांवर फवारणी केले जाणारे किटकनाशके यावर सभागृहात सखोल चर्चा होण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली.
मंत्री सुभाष देशमुख, एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, दिलीप वळसे- पाटील शिवाजीराव नाईक, अमित देशमुख, शरद सोनवणे, चंद्रदीप नरके, जयकुमार गोरे, चैनसुख संचेती, गोपालदास अग्रवाल, प्रशांत ठाकूर, सुनील केदार,विलासराव जगताप, संग्राम थोपटे, आर. टी. देशमुख, अनिल कदम, उल्हास पाटील, डॉ. सुजीत मिनचेकर, सुभाष पाटील, संध्यादेवी कुपेकर, जयकुमार गोरे, दीपिका चव्हाण आदींनी शोकभावना व्यक्त केल्या.
निष्ठेने काम करीत राहिले
डॉ. पतंगराव कदम यांना मुख्यमंत्री पदाने अनेकदा हुलकावणी दिली याचा उल्लेख बहुतेकांनी केला. असे असले तरी पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याची कोणतीही भावना न ठेवता ते निष्ठेने काम करीत राहिले, याचा उल्लेखही बहुतेकांनी केला.
डॉ.पतंगराव कदम हे आपल्यासाठी पितृतुल्य होते, अशा भावना विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केल्या.